...तर १० टक्के अतिरिक्त कर लादणार; ट्रम्प यांचा ‘ब्रिक्स’ देशांना इशारा

जो देश ‘ब्रिक्स’च्या अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिंबा देईल, त्या देशांवर अतिरिक्त १० टक्के आयात शुल्क आकारण्यात येईल, यामध्ये कोणताही देश अपवाद नसेल, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
...तर १० टक्के अतिरिक्त कर लादणार; ट्रम्प यांचा ‘ब्रिक्स’ देशांना इशारा
Published on

वॉशिंग्टन : जो देश ‘ब्रिक्स’च्या अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिंबा देईल, त्या देशांवर अतिरिक्त १० टक्के आयात शुल्क आकारण्यात येईल, यामध्ये कोणताही देश अपवाद नसेल, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये टॅरिफ धोरणासह बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यांचा समावेश आहे. अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्काचे हत्यार उगारले होते.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने धमकी दिली होती की, रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर तब्बल ५०० टक्के आयात शुल्क आकारला जाईल. यानंतर आता ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ देशांना मोठा इशारा दिला आहे. जो कोणता देश ‘ब्रिक्स’च्या अमेरिकाविरोधी धोरणांबरोबर जाईल, त्या देशांवर १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादले जाईल, तसेच या धोरणाला कोणताही देश अपवाद असणार नाही, अशी इशारावजा धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

जुन्या टाइपरायटरवर नवीन सॉफ्टवेअर चालवू शकत नाही - मोदी

'शांतता, सुरक्षा आणि जागतिक प्रशासनात सुधारणा' या विषयावरील ‘ब्रिक्स’ सत्रादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, ‘ब्रिक्स’चा विस्तार आणि नवीन भागीदारांचा समावेश ही या संघटनेची काळानुसार बदलण्याची क्षमता दर्शवते. आता आपण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना आणि बहुपक्षीय विकास बँकांसारख्या संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसाच दृढनिश्चय दाखवला पाहिजे. ‘एआय’च्या युगात, जिथे तंत्रज्ञान प्रत्येक आठवड्याला विकसित होत आहे, तिथे जागतिक संस्था ८० वर्षांपासून कोणत्याही सुधारणेशिवाय तशाच राहणे अस्वीकार्य आहे. तुम्ही २० व्या शतकातील टाइपरायटरवर २१ व्या शतकातील सॉफ्टवेअर चालवू शकत नाही.

चीनची भूमिका

‘ब्रिक्स’ हे उदयोन्मुख आणि विकसनशील राष्ट्रांसाठी सहकार्याचे एक व्यासपीठ आहे आणि ते कोणत्याही विशिष्ट देशाच्या विरोधात नाही. ‘ब्रिक्स’ला संघर्षात रस नाही. अतिरिक्‍त आयात शुल्काचा वापर करणे कोणाच्याही हिताचे नाही, असे चीनच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने सोमवारी स्‍पष्‍ट केले. ‘ब्रिक्‍स’ परिषदेतील जाहीरनाम्यानंतर ट्रम्‍प यांनी दिलेल्‍या अतिरिक्‍त १० टक्‍के करवाढीच्‍या धमकीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत चीनची भूमिका स्‍पष्‍ट केली.

logo
marathi.freepressjournal.in