"२४ तासांत निर्णय बदलला नाही तर ५० टक्के टॅक्स लावू" ; ट्रम्प यांची चीनला मोठी धमकी

अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने जगभरातील देशांवर परस्पर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर ३४ टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता ट्रम्प यांचा अजूनच संताप झाला असून...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे. ८ एप्रिलपर्यंत जर चीनने अमेरिकन वस्तूंवर लावलेले ३४ टक्के शुल्क हटवले नाही तर अमेरिका चिनी वस्तूंवर ५० टक्के शुल्क आकारेल, अशी सक्त ताकीद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

चीनने ८ एप्रिलपर्यंत शुल्क हटवले नाही तर ९ एप्रिलपासून चीनवर ५० टक्के शुल्क आकारले जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. निर्णय बदलण्यासाठी त्यांनी चीनला २४ तासांची मुदत दिली आहे. तसेच, शुल्क न हटवल्यास चीनने प्रस्तावित केलेल्या कोणत्याही बैठकीवरील वाटाघाटी त्वरित संपुष्टात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने जगभरातील देशांवर परस्पर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीननेही अमेरिकेप्रमाणेच तेथील वस्तूंवर (अमेरिकेतून आयात होणाऱ्या) ३४ टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता ट्रम्प यांचा अजूनच संताप झाला असून चीनने दरवाढ मागे न घेतल्यास ५० टक्के शुल्क आकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आपल्या टॅरिफ धोरणाचा बचाव करताना, जगातील अनेक देश अमेरिकेशी वाटाघाटी करत आहेत, मात्र आता वाटाघाटीसाठी योग्य पद्धत ठरवण्यात आली आहे. अनेक देशांनी अमेरिकेसोबतच्या व्यापारात अन्यायकारक वर्तन केले आहे. आता हे बदलावे लागेल, विशेषतः चीनला आपले वर्तन सुधारावे लागेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

भारतावरील कर २७ वरून २६ टक्के

अमेरिकेने भारतावरील आयात करात कपात केली आहे. हा कर २७ वरून २६ टक्के केला आहे. या नवीन करांची अंमलबजावणी ९ एप्रिलपासून होईल. यापूर्वी अमेरिकेच्या कागदपत्रानुसार, भारतावर २७ टक्के कर लावला होता. मात्र सुधारित कागदपत्रातील माहितीनुसार, हा कर २६ टक्के केला आहे. या एक टक्क्याचा फार मोठा परिणाम होणार नाही, असे उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in