१२ देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी; ७ देशांवरही कडक निर्बंध

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निर्णयांचा धडाका सुरू असून आता त्यांनी जगातील काही देशांची चिंता वाढवणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराण आणि अफगाणिस्तानसह १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली आहे, तर काही देशांमधील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निर्णयांचा धडाका सुरू असून आता त्यांनी जगातील काही देशांची चिंता वाढवणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराण आणि अफगाणिस्तानसह १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली आहे, तर काही देशांमधील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.

ट्रम्प यांनी बुधवारी ही घोषणा केली. यासह सात देशांमधील लोकांच्या प्रवेशावरही ट्रम्प यांनी कठोर प्रवास निर्बंध लादले आहेत. दहशतवादी आणि इतर धोक्यांपासून संरक्षणासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचे म्हणत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एका निर्णयावर स्वाक्षरी केली होती.

ट्रम्प यांनी प्रवेशबंदी घातल्याने आता या देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवास करता येणार नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातही अनेक देशांमधल्या लोकांवर प्रवास बंदी घातली होती. मात्र, नंतर ती उठवण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी बंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या सुरक्षेचा हवाला देत ट्रम्प यांनी सात देशांविरुद्धही कडक कारवाई केली आहे.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांच्या नागरिकांच्या अमेरिका प्रवासावर बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी या देशांव्यतिरिक्त, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात इतर देशांमधील लोकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी आणली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून प्रवास बंदी लागू होईल.

ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला होता, ज्यामध्ये राज्य आणि गृह सुरक्षा विभाग आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालकांना अमेरिकेच्या सुरक्षेसंदर्भात एक अहवाल तयार करण्यास आणि विशिष्ट देशांमधून येणारे लोक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात का, हे तपासून घेण्यास सांगितले होते. त्या अहवालानंतर, १२ देशांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे आणि ७ देशांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in