

नूक (ग्रीनलॅण्ड) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा आपला मनसुबा व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर ग्रीनलँडच्या संसदेतील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी ट्रम्प यांच्या विधानाला एकत्रितपणे प्रत्युत्तर दिले आहे. ग्रीनलँडचे भवितव्य फक्त तेथील नागरिकच ठरवू शकतात, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ग्रीनलँडच्या संसदेतील सर्व पाचही पक्षांच्या नेत्यांनी एका संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेचे किंवा डेन्मार्कचे नियंत्रणाचा प्रस्ताव नाकारला आहे. आम्हाला अमेरिकन होण्याची इच्छा नाही, आम्हाला डेन्मार्कचे नागरिकही बनायचे नाही, आम्हाला ग्रीनलँडर म्हणूनच राहावयचे आहे, असे त्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
या पक्षांनी अमेरिकेला या भूभागाबद्दल दुर्लक्षित वृत्तीने विचार करणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्रीनलँडच्या दर्जाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त तेथील लोकसंख्येचा असेल यावर त्यांनी जोर दिला आहे. "ग्रीनलँडच्या भविष्याचा निर्णय हा ग्रीनलँडर्सनीच घेतला पाहिजे," असे ते म्हणाले आहेत. आर्क्टिक क्षेत्रातील ग्रीनलँड या बेटाचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, ते अमेरिकेच्या ताब्यात घेण्याबाबत ट्रम्प यांनी वक्तव्य केले होते.
ट्रम्प यांनी आपल्याला वाटाघाटीतून निर्णय झाल्याचे आवडेल असे सुचवले मात्र त्यांनी बळाचा वापर करून बेटाचा ताबा घेण्याचेही संकेत दिले. मला सोप्या मार्गाने करार झालेला आवडेल, पण जर सोप्या मार्गाने करू शकलो नाहीत, तर आम्ही ते कठीण मार्गाने करू, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यापूर्वी ग्रीनलँड हस्तगत करण्याची आपली इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे. ग्रीनलँड हा किंग्डम ऑफ डेन्मार्क अंतर्गत असलेला एक सेमी-ऑटोनॉमस भूभाग असून तो नाटो अलायन्सचा सदस्यही आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या मागण्यांना डेन्मार्कने पूर्णपणे विरोध दर्शवला आहे.
ट्रम्प काय म्हणाले..
व्हाईट हाऊस येथे माध्यमांशी बोलताना ग्रीनलँडवर चीन किंवा रशिया यांना वर्चस्व स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका काहीतरी निर्णय घेईल, असे विधान केले आहे. आम्ही ग्रीनलैंडबाबत काहीतरी निर्णय घेऊ, मग तो लोकांना आवडो अथवा न आवडो, असे ट्रम्प म्हणाले. आपण काही हालचाल केली नाही तर रशिया किंवा चीन ग्रीनलँडचा ताबा घेतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. "आम्हाला रशिया किंवा चीन आमचा शेजारी म्हणून नको आहे," असेही ट्रम्प म्हणाले.