...तर दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावे लागेल! ट्रम्प यांचा मस्क यांना इशारा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या नवीन कर व खर्च विधेयकावर जोरदार टीका केली. याला ट्रम्प यांनी तत्काळ उत्तर देत, ‘... तर दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागू शकते’, असा इशारा दिला आहे.
नवे कर आणि खर्च विधेयक मंजूर झाल्यास दुसऱ्याच दिवशी मी ‘अमेरिका पार्टी’ची स्थापना करेन, असा इशारा मस्क यांनी ट्रम्प यांना दिला आहे. दरम्यान, मस्क यांनी अलीकडेच 'एक्स'वर एक पोल (मतदान) घेतले होते. त्यांनी अमेरिकन जनतेला नव्या राजकीय पक्षाबाबत त्यांचे मत विचारले होते. यावर मोठ्या संख्येने लोकांनी मस्क यांना पाठिंबा दर्शविल्याचे दिसले.
ट्रम्प यांचा पलटवार
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले आहे की, टेस्लाचे सीईओ खर्च कमी करणाऱ्या विभागाचे नेतृत्व करतात. त्यांनी सरकारी अनुदानांवर आणि करारांवर एक नजर टाकावी. मस्क यांना जास्त अनुदान मिळू शकते. अनुदानाशिवाय मस्क यांना कदाचित दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागेल. यापुढे रॉकेट प्रक्षेपण, उपग्रह किंवा इलेक्ट्रिक कार उत्पादन नाही. आपला देश खूप पैसे वाचवू शकेल. कदाचित आपल्याला खूप पैसे वाचवायचे आहेत, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचाही मस्क यांना अप्रत्यक्ष टोला
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही मस्क यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. देशात बेकायदेशीर स्थलांतरितांचा पूर आणणे हे इतर कोणत्याही धोरणापेक्षा देशाला अधिक दिवाळखोरीत टाकेल. देशाला इतर कोणत्याही धोरणापेक्षा जास्त दिवाळखोर करणारी गोष्ट म्हणजे देशात बेकायदेशीर स्थलांतरितांचा पूर आणणे आणि स्थलांतरितांना उदार लाभ देणे. 'वन बिग ब्युटिफुल बिल' ही समस्या सोडवते म्हणूनच नवीन कर विधेयक मंजूर झालेच पाहिजे, असे व्हान्स यांनी ट्विट केले आहे.
मस्क यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल
मस्क यांनी पक्षासाठी ‘अमेरिका पार्टी’ या नावाची घोषणा देखील केली होती. आपल्या देशाकडे डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन पार्टीशिवाय इतरही पर्याय असले पाहिजेत, ज्यामुळे जनता योग्य नेत्याची, पक्षाची निवड करू शकेल, असे मस्क यांनी म्हटले होते. मस्क यांनी म्हटले आहे की, ‘ट्रम्प सरकारच्या नवीन कर विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील. देशाचे मोठे आर्थिक व धोरणात्मक नुकसान होईल. हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचे आणि विध्वंसक आहे’.