Iran vs US-Israel War : बिनशर्त शरण या, तरच करार शक्य! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा सातवा दिवस असून हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहेत. दरम्यान, इराणने बिनशर्त आत्मसमर्पण केले तरच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा करार शक्य आहे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच, इराणमध्ये त्यानंतर एक नवीन आणि चांगले नेतृत्व निवडले जाईल, असेही ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प ( संग्रहित छायाचित्र )
डोनाल्ड ट्रम्प ( संग्रहित छायाचित्र )
Published on

तेल अवीव/तेहरान : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा सातवा दिवस असून हल्ले-प्रतिहल्ले सुरूच आहेत. दरम्यान, इराणने बिनशर्त आत्मसमर्पण केले तरच त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा करार शक्य आहे, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच, इराणमध्ये त्यानंतर एक नवीन आणि चांगले नेतृत्व निवडले जाईल, असेही ते म्हणाले. इराणने बिनशर्त आत्मसमर्पण केल्याशिवाय त्यांच्याशी कोणताही करार होणार नाही, असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘इराणला पुन्हा आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांसोबत मिळून काम करेल’, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ‘मेक इराण ग्रेट अगेन’ हा नारादेखील त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये दिला आणि भविष्यात इराण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि समृद्ध होऊ शकतो, असे म्हटले आहे.

इराणच्या नेता निवडीत अमेरिकेची भूमिका आवश्यक!

इराणने आपल्या संमतीशिवाय नवीन सर्वोच्च नेता निवडू नये, असे ट्रम्प यांनी बजावले आहे. तसेच नवीन नेत्याच्या निवडीमध्ये अमेरिकेची भूमिका आवश्यक असून अमेरिकेच्या सहभागाशिवाय असे करणे म्हणजे वेळेचा अपव्यय ठरेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. ‘एक्सिओस’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ‘जर इराणने अमेरिकेला सामील करून न घेता नवीन सर्वोच्च नेता निवडला, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. अली खामेनी यांचा मुलगा मुजतबा खामेनी याला संभाव्य उत्तराधिकारी मानले जात आहे, परंतु ते आम्ही स्वीकारणार नाही. जर नवीन नेत्यानेही जुन्या नेतृत्वाचे धोरण सुरूच ठेवले, तर अमेरिका आणि इराण यांच्यात येत्या वर्षांत पुन्हा संघर्ष होऊ शकतो. ते म्हणाले की, अमेरिकेला असा नेता हवा आहे जो इराणमध्ये शांतता आणि स्थिरता आणू शकेल.

इराकच्या कुर्दिस्तानमध्ये इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

इराणने इराकच्या कुर्दिस्तान प्रदेशात सशस्त्र कुर्दिश गटांच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इराणी सरकारी टीव्हीनुसार, या हल्ल्यांमध्ये इराणविरोधी फुटीरतावादी संघटनांना लक्ष्य करण्यात आले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर ड्रोन हल्ला

होर्मुझ सामुद्रधुनीत एका जहाजावर ड्रोनने हल्ला झाला आहे. त्यानंतर त्यात आग लागली. हे जहाज कोणत्या देशाचे होते किंवा ते कोणत्या प्रकारचे जहाज होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ड्रोन हल्ला कोणी केला हे देखील स्पष्ट झालेले नाही.

बसरा विमानतळावर ड्रोन हल्ला

इराकी सूत्रांचा हवाला देत अल जझिराने दिलेल्या वृत्तानुसार, इराकच्या बसरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराची ओळख अद्याप अस्पष्ट आहे.

‘१५ वा हवाई हल्ला’

इस्रायलने इराणी शहरांवर तेहरान आणि इस्फहानवर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायली लष्कराने ‘एक्स’वर पोस्ट केले की, या हल्ल्यांमध्ये इराणी राजवटीशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले. लष्कराने या कारवाईचे वर्णन ‘१५ वा हवाई हल्ला’ असे केले.

इराणचा युएईवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला

इराणने संयुक्त अरब अमिरातीवर नऊ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि १०० हून अधिक ड्रोनद्वारे हल्ला केला. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हवाई संरक्षण प्रणालींनी बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्यात आले.

कुवेतवर पुन्हा ड्रोन, क्षेपणास्त्रांचा हल्ला

कुवेतने म्हटले आहे की, त्यांच्या हवाई क्षेत्रावर पुन्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. मात्र, त्यांची हवाई संरक्षण प्रणाली या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे.

logo
marathi.freepressjournal.in