Iran vs US-Israel War : वाटाघाटी निष्फळ ठरल्यास मोठी कारवाई - ट्रम्प

इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेला यश न आल्यास मोठी लष्करी कारवाई करण्यात येईल, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.
Iran vs US-Israel War : वाटाघाटी निष्फळ ठरल्यास मोठी कारवाई - ट्रम्प
Iran vs US-Israel War : वाटाघाटी निष्फळ ठरल्यास मोठी कारवाई - ट्रम्प
Published on

वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेला यश न आल्यास मोठी लष्करी कारवाई करण्यात येईल, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. आम्ही आमची जहाजे सर्वोत्तम शस्त्रास्त्रांनी सज्ज करत आहोत, असे ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही देशांमधील नाजूक युद्धविराम सध्या दबावाखाली असून प्रादेशिक तणाव सातत्याने वाढत आहे. अमेरिकेने आपली लष्करी तयारीला वेग दिल्याने या भागातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

दुसरीकडे लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांमुळे या संघर्षात नवी ठिणगी पडली आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्रायलच्या या लष्करी कारवायांमुळे मध्यपूर्वेतील अस्थिरता अधिकच गडद झाली असून, त्याचा थेट परिणाम इराण आणि अमेरिकेतील राजनैतिक चर्चेवर होताना दिसत आहे. सातत्याने होणारे हल्ले आणि वाढती लष्करी हालचाल यामुळे यापूर्वी झालेला युद्धविराम आता संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली बदल!

पाकिस्तानमध्ये अमेरिका-इराण चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'जगातील सर्वात शक्तिशाली बदल' (वर्ल्ड्स मोस्ट पावरफुल रीसेट) असे सूचक विधान केले आहे. व्हान्स यांच्या पाकिस्तान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी शांतता कराराची प्रतीक्षा केली जात असतानाच या घडामोडी घडत आहेत. व्हान्स पाकिस्तानमध्ये इराणसोबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली.

जे.डी. व्हान्स चर्चेसाठी रवाना

अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण वाटाघाटी करण्याकरिता अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स शुक्रवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे रवाना झाले. प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी इराणला कडक शब्दांत सुनावताना "अमेरिकेसोबत 'खेळ' करण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा दिला आहे.

Iran vs US-Israel War : वाटाघाटी निष्फळ ठरल्यास मोठी कारवाई - ट्रम्प
युद्धविराम पण तात्पुरता; अमेरिका-इराणदरम्यान २ आठवड्यांची शस्त्रसंधी, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची शक्यता

ट्रम्प यांचा विश्वासू सहकारी मैदानात

सहा आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या या भीषण युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी जे.डी. व्हान्स यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता त्यांच्याच खांद्यावर शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आहे. इराणने वाटाघाटी न स्वीकारल्यास त्यांची "संपूर्ण संस्कृती नष्ट" करण्याची धमकी ट्रम्प यांनी यापूर्वीच दिली आहे.

शिष्टमंडळात कोण?

व्हान्स यांच्यासोबत ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जेअर्ड कुशनर हेही आहेत. कुशनर यांनी यापूर्वी इराणच्या अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांबाबत झालेल्या अप्रत्यक्ष चर्चांमध्ये सहभाग घेतला होता. या व्यतिरिक्त नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल आणि पेंटागॉनचे अधिकारीही त्यांना मदत करणार आहेत.

मुख्य अडथळे

मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या तात्पुरत्या युद्धबंदीनंतर दोन्ही देशांत मतभेद निर्माण झाले आहेत. लेबनॉनमधील इस्रायली हल्ले थांबवणे हा युद्धबंदीचा भाग असल्याचे इराणचे म्हणणे आहे, मात्र ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हे फेटाळून लावले आहे.

Iran vs US-Israel War : वाटाघाटी निष्फळ ठरल्यास मोठी कारवाई - ट्रम्प
US-Iran-Israel War : इराणचे नामोनिशाण मिटवू; ट्रम्प यांची नवी धमकी, इराणचेही प्रत्युत्तर

होर्मुझची सामुद्रधुनी

अमेरिकेने मागणी केली आहे की इराणने तत्काळ 'होरमुझची सामुद्रधुनी' जहाजांसाठी खुली करावी. इराणने ही जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, इराण जहाजांना मार्ग देण्याबाबत टाळाटाळ करत आहे, हे आम्हाला मान्य नाही.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित 'तस्नीम' या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, जोपर्यंत इस्रायल लेबनॉनवरील हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत शनिवारी होणारी चर्चा शक्य नाही.

इस्रायलची लेबनॉनसोबत वाटाघाटींना मंजुरी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लेबनॉनसोबत थेट चर्चा करण्यास परवानगी दिली आहे. हिजबुल्लाचे नि:शस्त्रीकरण करणे आणि लेबनॉनशी संबंध सुधारणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. १९४८ नंतर पहिल्यांदाच या दोन देशांमध्ये अशा प्रकारची थेट चर्चा होणार आहे.

Iran vs US-Israel War : वाटाघाटी निष्फळ ठरल्यास मोठी कारवाई - ट्रम्प
US-Iran-Israel War : वैमानिकाची थरारक सुटका; अमेरिकेची 'ऐतिहासिक' मोहीम : शेकडो कमांडो, डझनभर लढाऊ विमानांचा सहभाग

कुवैतचा आरोप

कुवैतनेही गुरुवारी रात्री आपल्यावर ड्रोन हल्ला झाल्याचा आरोप इराण आणि त्यांच्या समर्थित संघटनांवर केला आहे. इराणने हा आरोप फेटाळला असला तरी, या भागात यापूर्वी झालेल्या अशा अनेक हल्ल्यांमध्ये इराणचा हात असल्याचे मानले जाते.

युद्धविराम नाजूक

इराणचा अणुकार्यक्रम आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम हे या युद्धातील सर्वात मोठे वादाचे मुद्दे आहेत. इराणने समृद्ध युरेनियमचा साठा नष्ट करावा, अशी अमेरिकेची अट आहे. तर, अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर करणे हा आपला हक्क असल्याचे इराणचे म्हणणे आहे.

इस्लामाबाद लॉकडाऊनची स्थिती

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद सध्या पूर्णपणे बंदिस्त वातावरणात आहे. पाकिस्तानने आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी मोठी पावले उचलली असून, त्याचाच भाग म्हणून अमेरिका आणि इराण यांच्यातील महत्त्वाची बैठक येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. या उच्चस्तरीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने संपूर्ण इस्लामाबादमध्ये कडक नाकेबंदी केली आहे. शहरातील हजारो नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले असून, अनेक भागात लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे तेथे ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती निर्माण झाल्यासारखे वाटत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, लष्कर आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असून, वाहनांची तपासणी कडक करण्यात आली आहे. काही भागात इंटरनेट सेवा आणि संचार व्यवस्थेवरही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

लेबनॉनमधील नागरी मृत्यूंबाबत भारताने व्यक्त केली 'गंभीर चिंता'

नवी दिल्ली : लेबनॉनमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या नागरी मृतांच्या संख्येबद्दल भारताने शुक्रवारी "गंभीर चिंता" व्यक्त केली आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर होत असलेल्या जोरदार हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने ही अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, यामुळे अमेरिका आणि इराणमधील अनिश्चित अशा युद्धविराम करारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरी सुरक्षा प्राथमिकता

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी माध्यमांना सांगितले की, लेबनॉनमधील मोठ्या संख्येने होत असलेल्या नागरी मृत्यूंच्या वृत्ताने आम्ही अत्यंत चिंतेत आहोत. भारतासाठी नागरिकांचे संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारताने स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा तसेच प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे ही काळाची गरज आहे.

भारतीय समुदायाची सुरक्षा

लेबनॉनमधील विस्कळीत सुरक्षा व्यवस्थेवर बोलताना जैस्वाल म्हणाले की, तेथील भारतीय दूतावास भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून त्यांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच भारताने यूएन शांतता रक्षकांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता.

logo
marathi.freepressjournal.in