स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

राजधानी माद्रिदपासून सुमारे ३६० किलोमीटर अंतरावर एक ट्रेन रुळावरून घसरली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला धडकली.
स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Published on

अ‍ॅडामूझ (स्पेन) : दक्षिण स्पेनमध्ये रविवारी रात्री दोन हाय-स्पीड प्रवासी ट्रेनमध्ये भीषण अपघात झाला. एक ट्रेन रुळावरून घसरून थेट समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला धडकली. यात किमान २१ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यापैकी किमान १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताची तीव्रता अत्यंत भयंकर

हा अपघात कोर्दोबा प्रांतातील अ‍ॅदामूझ परिसरात, राजधानी माद्रिदपासून सुमारे ३६० किलोमीटर अंतरावर झाला. अंदालुसिया प्रादेशिक सरकारचे प्रमुख हुआन्मा मोरेनो यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. “अपघाताची तीव्रता अत्यंत भयंकर आहे. आम्हाला कदाचित (आणखी) मृतदेह सापडतील. ट्रेनचे धातूचे भाग हटवण्यासाठी जड यंत्रसामग्रीचा वापर करावा लागेल. अजूनही काही मृतदेह सापडण्याची शक्यता आहे.”

दोन्ही ट्रेनमध्ये मिळून सुमारे ४०० प्रवासी

माहितीनुसार, मालागाहून माद्रिदकडे जाणारी ‘इर्यो’ कंपनीची ट्रेन प्रथम रुळावरून घसरली आणि शेजारच्या रुळावरून येणाऱ्या माद्रिद-ह्युएल्वा मार्गावरील ‘रेन्फे’ ट्रेनवर आदळली. ज्यामुळे ती ट्रेन उतारावरून खाली कोसळली. इर्यो ट्रेनमध्ये ३०० हून अधिक प्रवासी होते, तर रेन्फे ट्रेनमध्ये सुमारे १०० प्रवासी होते. स्पॅनिश वृत्तपत्र El Pais च्या वृत्तानुसार, रेन्फे ट्रेन ताशी सुमारे २०० किमी वेगाने जात होती. पहिल्या ट्रेनचा वेग किती होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अनेकजण अजूनही अडकले

कोर्दोबा अग्निशमन दल प्रमुख पाको कार्मोना यांनी सांगितले की, इर्यो ट्रेनमधील प्रवाशांना काही तासांत बाहेर काढण्यात आले. मात्र, रेन्फे ट्रेनचे डब्यांचा पूर्णतः चुराडा झाल्याने अनेक प्रवासी अजूनही अडकले आहेत. अरुंद जागेमधून लोकांना बाहेर काढणे अत्यंत कठीण काम आहे. जखमींपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे,” असे त्यांनी सांगितले.

"हे खरोखरच विचित्र"

स्पेनचे वाहतूक मंत्री ऑस्कर पुएंते यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, सरळ मार्गावर रुळावरून ट्रेन घसरण्याची घटना घडणे हे "खरोखरच विचित्र" आहे असे त्यांनी नमूद केले. हा रेल्वे मार्ग मे महिन्यातच नूतनीकरण करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी कार्यक्रम केले रद्द; रेल्वे सेवा स्थगित

या भीषण दुर्घटनेनंतर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी सोमवारचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. राजा-राणी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, माद्रिद आणि अंदालुसिया दरम्यानची सर्व रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.

ही दुर्घटना स्पेनच्या रेल्वे इतिहासातील अत्यंत भीषण अपघातांपैकी एक मानली जात असून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in