

शारजा : अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष अजूनही सुरू असून याचा परिणाम जागतिक अर्थचक्रावर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून होर्मुझ सामुद्रधुनी या महत्त्वाच्या मार्गावरील कच्च्या तेलाची वाहतूक थांबली असतानाही, भारतीय ध्वज असलेले दोन द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) टँकर येत्या काही दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
पाइन गॅस, जग वसंत
'पाइन गॅस' आणि 'जग वसंत' ही दोन भारतीय एलपीजी वाहक जहाजे संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाजवळ तैनात आहेत. मरीन ट्रॅफिकच्या जहाज- ट्रॅकिंग डेटानुसार, दोन्ही जहाजे प्रवासाची तयारी करत असल्याचे संकेत प्रसारित करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणाशी संबंधित माहिती समोर आली की, टँकर संभाव्यतः शनिवारी रवाना होऊ शकतात, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
२२ जहाजे
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सावध भूमिका घेतली असून, या प्रदेशात आपल्या जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीची मागणी केली आहे. सध्या आखातात असलेल्या भारताच्या २२ जहाजांच्या ताफ्याच्या सुरक्षित हालचालींना आमचा पाठिंबा आहे, असे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सुरक्षित प्रवासासंदर्भात जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या आठवड्यात इराणने भारतीय ध्वज असलेल्या दोन एलपीजी वाहक जहाजांना सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली होती. ही जहाजे सुरक्षित भारतात पोहचली आहेत.