
अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणखी दोन भारतीय नागरिकांना फाशी देण्यात आली आहे. दोघांनाही हत्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘यूएई’च्या अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाला कळवले की, दोघांनाही फाशी देण्यात आली आहे.
दोघेही केरळचे रहिवासी आहेत. मोहम्मद रिनाश अरंगिलोट्टू आणि मुरलीधरन पेरुमथट्टा वलाप्पिल अशी त्यांची नावे आहेत. भारतीय दूतावासाने त्यांच्या दयायाचिका आणि माफीसाठी अपील केले होते. परंतु ‘यूएई’ सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली.
प्राप्त माहितीनुसार, रिनाश हा ‘अल ऐन’मधील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होता. त्याने यूएईच्या एका नागरिकाची हत्या केली होती, तर मुरलीधरनला एका भारतीय माणसाच्या हत्येप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
अलीकडेच, उत्तर प्रदेशातील बांदा येथील शहजादी खान या महिलेला १५ फेब्रुवारी रोजी यूएईमध्ये फाशी देण्यात आली होती. एका दाम्पत्याच्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर होती. २०२२ मध्ये अचानक लसीकरणानंतर बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहजादीनेच बाळाची हत्या केली, असा आरोप बाळाच्या पालकांनी केला. याप्रकरणी शहजादी दोन वर्षांपासून दुबई तुरुंगात होती. त्यानंतर युएईतील भारतीय नागरिकांच्या मृत्यूदंडाची शिक्षा चर्चेत आली.