

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर (६३) यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीचे वेळापत्रकही सादर केले असून, पुढील काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरपर्यंत नवीन पंतप्रधान पदभार स्वीकारतील, असे स्पष्ट केले आहे. सत्ताधारी पक्षाकडून नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहू, असे स्टार्मर यांनी सांगितले. तसेच, सत्तेचे हस्तांतरण शांततापूर्ण आणि पद्धतशीरपणे व्हावे यासाठी नवीन पंतप्रधानांना आपला पूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गेल्या आठवड्यात पोटनिवडणुकीत महत्त्वपूर्ण विजय मिळवून सोमवारीच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (ब्रिटिश संसद) परतलेले अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांच्यानंतर १० डाऊनिंग स्ट्रीटच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर मानले जात आहेत. मी या नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेत स्वतःहून पुढे येत उमेदवारी जाहीर करत आहे, असे बर्नहॅम यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजीनाम्याचे कारण
स्टार्मर यांच्या सरकारला सर्वात मोठा धक्का पीटर मँडेलसन यांच्या नियुक्तीमुळे बसला. वादग्रस्त बाल लैंगिक शोषणाचा आरोपी जेफ्री एपस्टाईन याच्याशी संबंध उघड होऊनही मँडेलसन यांची अमेरिकेतील ब्रिटिश राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे स्टार्मर यांच्या प्रतिमेला मोठी खीळ बसली.