युक्रेनला मिळणार नवे संरक्षण मंत्री - रुस्तम उमराव यांची नेमणूक

युक्रेनला मिळणार नवे संरक्षण मंत्री - रुस्तम उमराव यांची नेमणूक

जनतेतही सैन्याबद्दल प्रतिकूल मत बनत आहे .त्याची दखल घेऊन झेलेन्स्की यांनी हा बदल केला आहे

कीव्ह : गेले दीड वर्ष रशियाबरोबरील युद्धात गुंतलेल्या युक्रेनला आता नवीन संरक्षण मंत्री मिळणार आहेत. रुस्तम उमराव असे नवीन संरक्षण मंत्र्यांचे नाव असून ते ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांची जागा घेतील. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नुकताच हा बदल केला आहे.

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार वाढला आहे. विविध देशांकडून युक्रेनला तातडीची मदत म्हणून अनेक शस्त्रास्त्रे आणि आर्थिक निधी मिळत आहे. युक्रेन स्वत:ही जगभरातून बरीच शस्त्रास्त्रे विकत घेत आहे. या करारांमध्ये संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणावर दलाली घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप झाले आहेत. तसेच युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती चालवली आहे. काही अधिकारी सैन्यभरतीसाठीही लाच घेत आहेत.

युद्धामुळे देशाच्या अस्तित्व आणि भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना सेनादलांतील हा भ्रष्टाचार वाढणे चिंतेची बाब आहे. त्यामुळे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा भ्रष्टाचार निपटून काढण्याचा चंग बांधला आहे. त्याचाच भाग म्हणून संरक्षण मंत्री बदलले जात आहेत. सध्याचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांच्याविरुद्ध थेट भ्रष्टाचाराचे आरोप झाले नसले, तरी ते त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याची तक्रार होत आहे. या प्रकरणांमुळे युद्ध आघाडीवर लढणाऱ्या सामान्य सैनिकांचे मनोबलही घटत आहे. जनतेतही सैन्याबद्दल प्रतिकूल मत बनत आहे. त्याची दखल घेऊन झेलेन्स्की यांनी हा बदल केला आहे. उमराव यांची जनतेतील प्रतिमा स्वच्छ आहे.

रुस्तम उमराव यांची संरक्षण मंत्रिपदी नेमणूक करण्यात झेलेन्स्की यांचा आणखी एक हेतू आहे. उमराव हे क्रिमिया प्रांतातील तातार वंशाचे नागरिक आहेत. युक्रेनचा क्रिमाया प्रांत रशियाने २०१४ साली बळकावला आहे. तसेच दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीला साथ दिल्याचा आरोप करत तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या नेत्यांनी तातार वंशियांवर बरेच अत्याचार केले होते. त्यांना क्रिमियातून हाकलून लावले होते. रुस्तम उमराव याच तातार वंशाचे आहेत. त्यांच्या नेमणुकीतून झेलेन्स्की यांना हेच दाखवून द्यायचे आहे की, रशियाने बळकावलेला क्रिमिया प्रांत परत मिळवण्याबद्दल युक्रेन गंभीर आहे.

logo
marathi.freepressjournal.in