चीनमध्ये बेरोजगारीचा नीचांक - २१ टक्के तरुण विनारोजगार

चीनची अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे, मात्र कोरोनानंतर तिच्या वाढीचा दर बराच घसरला आहे.
चीनमध्ये बेरोजगारीचा नीचांक - २१ टक्के तरुण विनारोजगार

बीजिंग : कोरोनाच्या महासाथीनंतर अर्थव्यवस्थेने अपेक्षेप्रमाणे भरारी न घेतल्याने चीनमध्ये तरुणांच्या बेरोजगारीच्या दराने नीचांक गाठला आहे. गेल्या महिन्यात १६ ते २४ वयोगटातील तरुणांना रोजगार नसण्याचे प्रमाण २१.३ टक्क्यांवर पोहोचले.

चीनची अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे, मात्र कोरोनानंतर तिच्या वाढीचा दर बराच घसरला आहे. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यांत चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर केवळ ०.८ टक्के होता. प्रामुख्याने रिटेल विक्री आणि गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाल्याने वाढीचा दर कमी राहिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनानंतर जगभरात चिनी मालाची मागणी घटली आहे. तसेच चीनच्या सरकारची कर्जेही वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा अनेक कारणांमुळे चिनी अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसली आहे.

चीनच्या विविध शिक्षण संस्थांमधून यंदा तब्बल ११.५८ दशलक्ष विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडणार आहेत. अर्थव्यवस्थेची वाढ खुंटली असताना इतक्या मोठ्या संख्येने निर्माण होणाऱ्या पदवीधरांना रोजगार उपलब्ध करून देणे, ही चिनी सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कोरोनापश्चात जगात उद्योगधंदे आणि व्यावसायिक जगातील गरजा बदलल्या आहेत. चीनच्या विद्यापीठांत दिले जाणारे शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्राच्या नव्या गरजा यांच्यात मोठी तफावत असल्यानेही पदवीधरांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत आहेत. बेरोजगारीचा हा दर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे बेरोजगार तरुण समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत आणि सद्यस्थितीवर कठोरपणे मतप्रदर्शन करत आहेत. तसे होणे सुरू राहिले तर चीनच्या सरकारविरुद्ध असंतोष वाढीस लागेल आणि लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास आणखी कमी होईल, असा धोका हँग सेंग बँक चायनाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ डॅन वांग यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in