अमेरिकेचे व्हिसा नियम आणखी कडक

अमेरिकेने परदेशी विद्यार्थी, एक्स्चेंज व्हिजिटर्स (माहिती/संस्कृती आदानप्रदान करणारे) आणि पत्रकारांसाठीचे व्हिसा नियम अधिक कडक केले आहेत. यामुळे अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी देणारे धोरण आता संपुष्टात आले आहे.
अमेरिकेचे व्हिसा नियम आणखी कडक
अमेरिकेचे व्हिसा नियम आणखी कडक(संग्रहित छायाचित्र)
Published on

वॉशिंगटन : अमेरिकेने परदेशी विद्यार्थी, एक्स्चेंज व्हिजिटर्स (माहिती/संस्कृती आदानप्रदान करणारे) आणि पत्रकारांसाठीचे व्हिसा नियम अधिक कडक केले आहेत. यामुळे अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी देणारे धोरण आता संपुष्टात आले आहे.

नव्या नियमांनुसार, एफ व्हिसाधारक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतून मायदेशी परतण्यासाठी किंवा दुसऱ्या शाळेत ट्रान्स्फर घेण्यासाठी अथवा व्हिसा स्टेटस बदलण्यासाठी मिळणारा वेळ ६० दिवसांवरून कमी करून ३० दिवस करण्यात आला आहे. सध्याच्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांचा व्हिसा त्यांच्या अभ्यासाचा कालावधी आणि त्यानंतर ‘ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग’ अंतर्गत मिळणाऱ्या ३ वर्षांपर्यंत वैध राहत असे.

माध्यम क्षेत्रातील लोकांसाठी असणाऱ्या 'टी' व्हिसाचा कालावधी आता कमाल २४० दिवसांपुरताच मर्यादित करण्यात आला आहे, तर चिनी नागरिकांसाठी हा कालावधी केवळ ९० दिवसांचा असेल. सद्यस्थितीत पत्रकारांच्या व्हिसासाठी अशी कोणतीही निश्चित कालमर्यादा नव्हती आणि ते वर्षानुवर्षे तेथे राहू शकत होते.

विद्यार्थी म्हणून राहणाऱ्यांना चाप

परदेशी विद्यार्थी (एफ व्हिसा) आणि एक्सचेंज व्हिजिटर्स (जे व्हिसा) यांना त्यांच्या ठरावीक कोर्सच्या कालावधीपुरतीच परवानगी दिली जाईल, जी कमाल ४ वर्षांपेक्षा जास्त नसेल, असे डीएपएसने स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत अनिश्चित काळासाठी प्रवेश दिला जात होता. यामुळे अनेक जण सतत नवनवीन कोर्सेसना प्रवेश घेऊन देशातच मुक्काम वाढवत असत.

१९७८ सालापासून परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याची मुभा होती. त्यामुळे मायदेशी परतणे टाळण्यासाठी वर्षानुवर्षे शिक्षण घेत राहणाऱ्या 'फॉरेव्हर स्टुडंट्स'च्या संख्येत मोठी वाढ झाली होती. नवा निर्णय या प्रकारांना आळा घालणारा ठरेल. याशिवाय नियमित पडताळणीमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल, असे डीएचएसचे म्हणणे आहे.

भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम

'ओपन डोअर्स २०२५' च्या अहवालानुसार, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ३,६३,०१९ भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. मागच्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये ९.५ टक्क्यांची वाढ झाली होती. विशेष म्हणजे, अमेरिकेतील एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी एकट्या भारताचे प्रमाण जवळपास ३१ टक्के आहे. त्यामुळे या कडक नियमांचा सर्वाधिक प्रभाव भारतीय विद्यार्थ्यांवर पडू शकतो.

मुदतवाढीसाठी कडक तपासणी

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक कोर्स पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळेची गरज असेल, त्यांना आता थेट 'युएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस'कडे अधिकृतपणे मुदतवाढीसाठी अर्ज करावा लागेल. यामुळे विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्याचे अधिकार विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांकडून काढून थेट केंद्रीय अधिकाऱ्यांकडे जातील. तसेच अर्जदारांना बायोमेट्रिक पडताळणी, बॅकग्राउंड चेक आणि फसवणूक रोखण्यासाठीच्या कडक तपासणीला सामोरे जावे लागेल.

नव्या नियमांनुसार सध्या अमेरिकेत 'ड्युरेशन ऑफ स्टेटस' (अनिश्चित काळासाठी वैध) अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांचे व्हिसा स्टेटस आपोआप नवीन सिस्टीममध्ये वर्ग केले जातील आणि त्यांचा राहण्याचा कालावधी या नियमाच्या लागू होण्याच्या तारखेपासून कमाल ४ वर्षांसाठी मर्यादित केला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in