अमेरिकेकडून भारतासह जगभरात २५ टक्के ‘टॅरिफ’ लागू

अमेरिकेने भारतासह जगभरातील विविध देशांवर लादलेले २५ टक्के ‘टॅरिफ’ गुरुवारपासून (७ ऑगस्ट) लागू झाले आहे. भारतावर आणखी २५ टक्के ‘टॅरिफ’ २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. आतापर्यंत भारतीय वस्तूंवर १० टक्के ‘टॅरिफ’ लागत होते. ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ वॉर’मुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारात महाग मिळणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्पसंग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतासह जगभरातील विविध देशांवर लादलेले २५ टक्के ‘टॅरिफ’ गुरुवारपासून (७ ऑगस्ट) लागू झाले आहे. भारतावर आणखी २५ टक्के ‘टॅरिफ’ २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. आतापर्यंत भारतीय वस्तूंवर १० टक्के ‘टॅरिफ’ लागत होते. ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ वॉर’मुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारात महाग मिळणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतावर आणखी ‘टॅरिफ’ लावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच चीनवरही आणखी ‘टॅरिफ’ लावण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील बहुतांशी देशांवर गुरुवारपासून अधिकृतरीत्या २५ टक्के टॅरिफ लागू केले. व्हाईट हाऊसने सांगितले की, ६० देशांवर २५ टक्के ‘टॅरिफ’ ; युरोपियन महासंघ, जपान, दक्षिण कोरियावर १५ टक्के ; तैवान, व्हिएतनाम व बांगलादेशावर २० टक्के ‘टॅरिफ’ लागू करण्यात आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिका शेकडो अब्ज डॉलरचे शुल्क आकारत आहे, परंतु ते महसुलाचा विशिष्ट आकडा देऊ शकत नाहीत, कारण आम्हाला अंतिम आकडा काय आहे हे माहीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक अनिश्चिततेबाबत ट्रम्प म्हणाले की, सर्वंकष ‘टॅरिफ’मुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेबाबत स्पष्टता निर्माण होईल. त्यामुळे अमेरिकेकडे पुन्हा गुंतवणुकीचा ओघ वळू शकेल. तसेच रोजगारात मोठी वाढ होईल. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था उत्पादन क्षेत्रातील मोठी शक्ती बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही भारतावर ५० टक्के ‘टॅरिफ’ लागू केले. रशियाकडून तेल खरेदीत चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. तुम्ही भारताप्रमाणेच चीनवर ‘टॅरिफ’ लावणार का? या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, आम्ही भारतावर मोठ्या प्रमाणावर ‘टॅरिफ’ लावले. अनेक देशांवरही ते लागू केले आहे. त्यात चीनचाही समावेश होऊ शकतो.

ट्रम्प यांनी ३० जुलैला भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के ‘टॅरिफ’ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी आणखी २५ टक्के ‘टॅरिफ’ भारतावर लावण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतावर एकूण ‘टॅरिफ’ ५० टक्के होणार आहे. नवीन २५ टक्के ‘टॅरिफ’ २७ ऑगस्टपासून लागू होईल.

भारताची निर्यात घटणार

‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’चे (जीटीआरआय) संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले की, ‘टॅरिफ’मुळे अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीत ४० ते ५० टक्के कपात होऊ शकते, तर भारतीय निर्यातदारांनी सांगितले की, माल विकायला त्यांच्याकडे अमेरिकेशिवाय अन्य देशांची बाजारपेठ आहे. भारताच्या अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, दागिने, वस्त्रोद्योग व वाहनाचे सुटे भाग आदींच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे सध्या जगभरातून मागणीही कमी झाली आहे.

अमेरिकेचे ५० टक्के ‘टॅरिफ’ तर्कहीन - भारत

अमेरिकेने भारतीय मालावर एकतर्फीपणे ५० टक्के ‘टॅरिफ’ लावण्याच्या निर्णयामागे कोणताही तर्क किंवा कारण नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध विभागाचे सचिव डॅम्मू रवी यांनी सांगितले. भारतीय वस्तूंवर ‘टॅरिफ’ दुप्पट केल्यानंतरही भारत आणि अमेरिकेत वाटाघाटी सुरू आहेत, असे त्यांनी ‘लाईड ब्राझील-इंडिया फोरम’च्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्या वाटाघाटी सुरूच असून आम्हाला खात्री आहे की, परस्पर भागीदारीच्या दृष्टीने लवकरच तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.

भारत सरकारचे वाणिज्य खाते अमेरिकेसोबत वाटाघाटी करत आहे. आपण तोडग्याच्या जवळ पोहोचलो होतो. पण हा वेग सध्या काही कालावधीसाठी थांबला आहे, पण लवकरच पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in