

कराकस: अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष अधिकाधिक तीव्र झाला असून शनिवारी सकाळी अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर हवाई हल्ले केले. त्यानंतर काही तासांत अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
मीडिया साइटवरील हँडलवर याची ट्रम्प यांनी टुथ या सोशल माहिती दिली. ते म्हणाले, अमेरिकेने शनिवारी व्हेनेझुएला आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. अमेरिकन सैन्याने या कारवाईत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले असून त्यांना देशाबाहेर हाकलून दिले आहे.
शनिवारी पहाटे स्थानिक वेळेनुसार राजधानी कराकसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी व्हेनेझुएलामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. यानंतर कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावा पेट्रो यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा देत ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स (ओएएस) आणि संयुक्त राष्ट्रांची आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली. निकोलस मादुरो यांचा गुरुवारी एक व्हिडीओ प्रसारित झाला होता. व्हेनेझुएलामधील राजवट बदलण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. व्हेनेझुएलामधील विस्तृत असे तेल साठे मिळवण्यासाठी अमेरिकेकडून कोणत्याही वेळी हल्ला होऊ शकतो, असा कयास त्यांनी बांधला होता.
तेलसमृद्ध व्हेनेझुएला
जगातील २० टक्के तेलाचे साठे व्हेनेझुएलामध्ये आहेत. या तेलसमृद्ध देशामध्ये ३०३ अब्ज पिंपांपेक्षा जास्त तेल आहे. हे साठे मुख्यतः पूर्व व्हेनेझुएलाच्या ओरिनोको बेल्ट येथे आढळतात. हे तेल कठीण किंवा अति-कठीण श्रेणीतील आहे, त्यामध्ये गंधकाचे प्रमाण अधिक असून त्याच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रक्रियांची आवश्यकता असते. व्हेनेझुएलाची ९० टक्के अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक संकट, गैरव्यवस्थापन आणि २०१९पासून अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे तेथील तेलाचे उत्पादन घटले आहे.