

दुबई : इराणने अमेरिकेचे 'एमक्यू-१ प्रेडेटर' हे ड्रोन पाडल्यानंतर, अमेरिकेने सोमवारी इराणमधील रडार आणि ड्रोन नियंत्रण केंद्रांवर जोरदार बॉम्बवर्षाव केला. दरम्यान, इराणनेही याला प्रत्युत्तर म्हणून प्रतिहल्ला केल्याचे मान्य केले आहे, तर शेजारील कुवेतने आपल्या दिशेने येणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचे सांगितले आहे. या दोन्ही देशांमधील ताज्या हल्ल्यांमुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धविरामाची स्थिती कमालीची नाजूक बनली आहे. अमेरिका आणि इराणचे अधिकारी हा युद्धविराम वाढवण्यासाठी वाटाघाटी करत असतानाच हे हल्ले झाले आहेत.
होर्मुझ कोंडी कायम
युद्धविराम चर्चेच्या दरम्यानही इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवरील आपली पकड घट्ट ठेवली आहे. जागतिक स्तरावर व्यापार होणाऱ्या एकूण खनिज तेल आणि नैसर्गिक वायूपैकी तब्बल २० टक्के हिस्सा याच मार्गावरून जात असल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, इस्रायलने लेबनॉनमधील लितानी नदीपलीकडे आपले नियंत्रण वाढवल्यामुळे आणि हिजबुल्लाकडून इस्रायलवर सातत्याने ड्रोन हल्ले सुरू असल्यामुळे प्रादेशिक संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे.
वन-वे अटॅक ड्रोन
अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शनिवारी आणि रविवारी इराणमधील 'गेरुक' शहर आणि 'केशम' बेटाच्या आसपास हे हल्ले केले. "आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत उड्डाण करणाऱ्या अमेरिकेच्या एमक्यू-१ ड्रोनला इराणने पाडल्यानंतर, आम्ही ही मोजकी आणि अत्यंत विचारपूर्वक कारवाई केली आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी तत्काळ कारवाई करत इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, एक ग्राउंड कंट्रोल स्टेशन आणि प्रादेशिक समुद्रातून प्रवास करणाऱ्या जहाजांना धोका निर्माण करणारे इराणचे दोन 'वन-वे अटॅक' ड्रोन नष्ट केले," असे सेंट्रल कमांडने स्पष्ट केले. या हल्ल्यात कोणताही अमेरिकन सैनिक जखमी झालेला नाही.
अन्नधान्य तुटवड्याची भीती
गेल्या वीकेंडला अमेरिकेने इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गॅम्बियाच्या एका मालवाहू जहाजाच्या इंजिन रूमवर क्षेपणास्त्र डागले होते. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सध्या अत्यंत कमी जहाजे बाहेर पडू शकत आहेत. यामुळे केवळ ऊर्जा पुरवठाच नाही, तर रासायनिक खतांच्या पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. जागतिक स्तरावर व्यापार होणाऱ्या रासायनिक खतांपैकी ३० टक्के खते याच आखाती देशांमध्ये तयार होतात.