अखेर युद्ध संपले; अमेरिका-इराणमध्ये शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी; करारात १४ मुख्य मुद्दे; मोदींसह जागतिक नेत्यांकडून कराराचे स्वागत

अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले अमेरिका आणि इराणमधील युद्ध अखेर संपले असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला असून १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील एका कार्यक्रमात त्यावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली जाणार आहे.
अखेर युद्ध संपले; अमेरिका-इराणमध्ये शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी; करारात १४ मुख्य मुद्दे; मोदींसह जागतिक नेत्यांकडून कराराचे स्वागत
Published on

वॉशिंग्टन : अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले अमेरिका आणि इराणमधील युद्ध अखेर संपले असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला असून १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील एका कार्यक्रमात त्यावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली जाणार आहे.

सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' मार्गावरील नाकेबंदी त्वरित उठवून तो मार्ग पुन्हा खुला करण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मुक्त प्रवाह पुन्हा पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले. इराणनेही निवेदन जारी करून सांगितले की, अमेरिकेसोबत अनेक महिने चाललेल्या प्रदीर्घ व कठीण वाटाघाटीनंतर दोन्ही देशांनी एका सामंजस्य कराराला अंतिम रूप दिले आहे. दरम्यान, इस्रायलने या कराराचे पालन करण्यास आम्ही बांधील नसल्याचे स्पष्ट केल्याने परिस्थिती पुन्हा बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.

शरीफ यांचीही घोषणा

सोमवारी पहाटे 'एक्स'वर एका पोस्टमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सांगितले की, सखोल वाटाघाटींनंतर आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की अमेरिका आणि इस्लामिक प्रजासत्ताक इराण यांच्यात शांतता करार झाला आहे. दोन्ही बाजूंनी लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील सैन्य कारवाया त्वरित आणि कायमस्वरूपी थांबवण्याची घोषणा केली आहे. याबाबतचा अधिकृत स्वाक्षरी कार्यक्रम शुक्रवारी, १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होईल, असेही ते म्हणाले.

इराणचे उप-परराष्ट्र मंत्री काझेम घरीबाबादी यांनी स्पष्ट केले आहे की, सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सुरू होणाऱ्या अमेरिका-इराण यांच्यातील ६० दिवसांच्या वाटाघाटी या, अमेरिका आधी तीन विशिष्ट आश्वासने पूर्ण करते की नाही, यावर अवलंबून असतील. घरीबाबादी यांच्या मते, अमेरिकेने तीन पावले उचलणे आवश्यक आहे: नौदल नाकेबंदी संपवणे; युद्ध आणि सर्व लष्करी कारवाया थांबवणे आणि इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे.

नेतान्याहूंची भूमिका

या करारामध्ये लेबनॉनचा समावेश असण्याची शक्यता आहे. पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हा करार लेबनॉनला लागू होणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. तसेच या शांतता कराराच्या घोषणेनंतरही इस्रायलने लेबॉनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले सुरु ठेवले आहेत. त्यात या करारावेळी झालेल्या चर्चेचा भाग इस्रायल नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. त्यामुळे अमेरिकेने इराणसोबत युद्धबंदीवर सहमती दर्शवली तरी इस्रायल या निर्णयाचे पालन करण्यास बांधील नसेल.

शांतता कराराचे मोदींकडून स्वागत

पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वागत केले. या कराराच्या अंमलबजावणीमुळे प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण होईल, तसेच सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य सुनिश्चित होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

होर्मुझमधून भारतीय एलएनजी जहाज 'दिशा'ची सुरक्षित सुटका

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला मोठे यश आले आहे. भारतीय ध्वजधारक ‘दिशा’ हे एलएनजीवाहू जहाज ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ या अत्यंत संवेदनशील सागरी क्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर पडले आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर पडणारे हे पहिले भारतीय एलएनजी जहाज ठरले आहे.

वायूचा साठा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमद्वारे (संस्था समूह) या जहाजाचे व्यवस्थापन केले जात आहे. सध्या या जहाजावर ६२,३७० मेट्रिक टन एलएनजी कार्गो आहे. हे जहाज १८ जूनपर्यंत भारतातील गुजरात येथील दाहेज बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.

खलाशांची घरवापसी

युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीय खलाशांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ३,५८७ हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले आहे, ज्यामध्ये गेल्या ९६ तासांत आणलेल्या ५० खलाशांचा समावेश आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली

'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. सर्वांचे अभिनंदन! याद्वारे मी होर्मुझची सामुद्रधुनी विनाशुल्क वाहतुकीसाठी खुली करण्यास आणि त्याचवेळी अमेरिकन नौदलाला नाकेबंदी त्वरित हटवण्याचे पूर्ण अधिकार देत आहे. जगातील जहाजांनो, तुमची इंजिने सुरू करा. तेलाचा प्रवाह सुरू होऊ द्या, असे ट्रम्प म्हणाले.

जगभरातील नेत्यांकडून स्वागत

ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थांचा पाठिंबा असलेल्या या कराराचे कतार, तुर्की, युनायटेड किंगडम, जर्मनी आणि फ्रान्स यांनी स्वागत केले; तसेच सर्व संबंधित पक्षांनी या कराराची पूर्णपणे अंमलबजावणी करावी आणि संवादाद्वारे शाश्वत शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन या देशांच्या नेत्यांनी केले.

इराणच्या तीन अटी

इराण आणि अमेरिका यांच्यातील कराराचा संपूर्ण मजकूर अद्याप जाहीर करण्यात आला नाही. मात्र, इराणी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील सामंजस्य करारात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. यामध्ये युद्ध आणि लष्करी कारवाया थांबवणे, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे, अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवणे, इराणची गोठवलेली काही मालमत्ता (निधी) मुक्त करणे आणि अणुकार्यक्रम व निर्बंधांबाबत पुढील ६० दिवसांत वाटाघाटींसाठी एक आराखडा तयार करणे या गोष्टींचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in