रशियाविरोधात लढणाऱ्या युक्रेनला अमेरिका देणार पॅट्रियाट क्षेपणास्त्र

रशियाविरोधात लढणाऱ्या युक्रेनला मोठी सैन्य मदत देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.
(रशिया-युक्रेन युद्धाचे संग्रहित छायाचित्र)
(रशिया-युक्रेन युद्धाचे संग्रहित छायाचित्र)

वॉशिंग्टन : रशियाविरोधात लढणाऱ्या युक्रेनला मोठी सैन्य मदत देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. यात अमेरिका युक्रेनला ६ अब्ज डॉलरची मदत करेल. त्यातून युक्रेन शस्त्रास्त्रांची खरेदी करणार आहेत. यात पॅट्रियॉट क्षेपणास्त्र, एनएएसएएमएस हवाई संरक्षण यंत्रणा आदींचा समावेश आहे. यामुळे युक्रेनला रशियन हवाई हल्ल्यापासून वाचण्यास मदत मिळेल. पॅट्रियट क्षेपणास्त्र देण्याची मागणी अमेरिकेकडे युक्रेन करत होता.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईट ऑस्टीन यांनी सांगितले की, अमेरिकेने युक्रेनला केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी मदत आहे. युक्रेन सुरक्षा सहाय्य मदत मोहिमेंतर्गत मदत दिली जाईल, ज्यातून युक्रेन अमेरिकन कंपन्यांकडून नवीन शस्त्रास्त्रे खरेदी करू शकतो. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा लवकरच केला जाईल. यात ड्रोन्सविरोधी यंत्रणा, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र व आधुनिक शस्त्रास्त्रे दिली जातील.

अमेरिकेने युक्रेनला ६० अब्ज डॉलरची मदत करण्याची घोषणा केली होती. ६ अब्ज डॉलरची मदत ही त्याचाच भाग आहे. यामुळे रशियाविरोधी लढाईत युक्रेनला मदत मिळेल. यूक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमिर जेलेन्स्की यांनी अमेरिकेने दिलेल्या मदतीबाबत आनंद व्यक्त केला. आम्हाला आणखी हवाई संरक्षण यंत्रणेची गरज आहे. त्यामुळे आम्हाला रशियन हवाई हल्ल्याचा मुकाबला करता येऊ शकेल.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टीन म्हणाले की, अमेरिका व त्याच्या मित्र देशांनी युक्रेनला ७० मध्यम ते लांब पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा, हजारो क्षेपणास्त्रे, ३ हजार चिलखती वाहने, ८०० रणगाडे, १० हजार रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र दिली आहेत. युक्रेनला लवकरच ‘एफ-१६’ हे लढाऊ विमान दिले जाईल. युक्रेनवर पुतिन यांनी कब्जा केल्यास संपूर्ण युरोपवर त्यांचा प्रभाव दिसू लागेल, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in