
वॉशिंग्टन : तीन दिवसांपूर्वी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर युक्रेनची तात्पुरती लष्करी मदत अमेरिकेने थांबवण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
एका अमेरिकन वर्तमानपत्राने ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन सांगितले की, ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेकडून दिली जाणारी लष्करी मदत तात्पुरती रोखली आहे. युक्रेनला १ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रे व दारुगोळा सध्या दिला जाणार होता. तो आता थांबला आहे. व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर युक्रेनची मदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने युक्रेनला आतापर्यंत ६५.९ अब्ज डॉलरची मदत केली आहे.
ट्रम्पनी लादले मेक्सिको, कॅनडावर २५ टक्के, तर चीनवर २० टक्के शुल्क
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क युद्ध (टेरिफ वॉर) सुरू केले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारपासून कॅनडा, मेक्सिकोच्या मालावर २५ टक्के, तर चिनी मालावर २० टक्के शुल्क लावले. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको व चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकन मालावर कर लादले आहेत. रुझवेल्ट रूममध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, कॅनडा आणि मेक्सिकोच्या मालावर यापुढे २५ टक्के शुल्क, तर चीनवर २० टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनवर १० टक्के शुल्क लावले होते. मेक्सिको, कॅनडा या शेजारी देशांवर शुल्क लादल्याने त्यांच्याकडून होणारी तस्करी व अवैध स्थलांतरण रोखले जाऊ शकते. या देशांसोबतची अमेरिकेची व्यापारी तूट पूर्ण नष्ट करणे हे माझे ध्येय आहे. तसेच अधिकाधिक कारखाने पुन्हा अमेरिकेत सुरू करायचे आहेत, असे ट्रम्प म्हणाले.