अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा धक्का; संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत BLA वर बंदी घालण्याचा प्रस्ताव रोखला
न्यू यॉर्क: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर (बीएलए) बंदी घालण्याचा प्रस्ताव रोखून अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) पाकिस्तान आणि चीनने एकत्र येत 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' आणि तिची सशस्त्र शाखा असलेल्या 'माजीद ब्रिगेड' संघटनेवर बंदी घालण्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडला. मात्र, पाकिस्तान आणि चीनच्या या संयुक्त प्रयत्नाला अमेरिका, यूके आणि फ्रान्सने रोखले आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.
पुरेसे पुरावे नाहीत
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि 'माजीद ब्रिगेड' वर बंदी घालण्याच्या मागणीचा प्रस्ताव रोखताना अमेरिका, यूके आणि फ्रान्सने संयुक्तपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७व्यवस्थेअंतर्गत काही नियमांचा दाखला देत या संघटनांना 'अल कायदा' किंवा 'आयएसआयएल'शी जोडण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिका, यूके आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १९९९ च्या १२६७ च्या ठरावाचा संदर्भ यासाठी दिला आहे.
दरम्यान, यापूर्वीही पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि माजिद ब्रिगेडवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी ही मागणी केली. दहशतवादी गट आयएसआयएल, अल-कायदा, तहरिक-ए-तालिबान, बीएलए आणि माजीद ब्रिगेड हे अफगाणिस्तानातून सीमापार हल्ले करत आहेत. त्यामुळे पाकिस्तान १२६७अंतर्गत बीएलए आणि माजिद ब्रिगेडवर बंदी घालण्याची विनंती सादर करत आहे, असे ते म्हणाले.
माजीद ब्रिगेड
माजीद ब्रिगेडला 'बीएलए'ची 'विशेष सैनिकी तुकडी' मानले जाते. या ब्रिगेडचे नाव माजीद लंगोवे सीनियर आणि माजीद लंगोवे ज्युनियर या दोन भावांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. १९७४ मध्ये क्वेट्टा दौऱ्यावर असताना तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या हत्येच्या प्रयत्नात सीनियर माजीद मारला गेला, तर २०१० मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत सहकाऱ्याला वाचवताना ज्युनियर माजीदचा मृत्यू झाला. या दोन्ही भावांच्या सन्मानार्थ, बीएलएने एक आत्मघातकी पथक स्थापन करून त्याला 'माजीद ब्रिगेड' असे नाव दिले.
'बीएलए' नेमके काय?
सन २००० च्या दशकाच्या सुरुवातीस 'बलुच लिबरेशन आर्मी'ची स्थापना करण्यात आली. पाकिस्तान सरकारने बलुचींना आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या विकासापासून - वंचित ठेवल्याचा त्यांचा आरोप असून त्यामुळेच बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचा उद्देश त्यांच्या आंदोलनामागे आहे. या संघटनेत बलुचिस्तानातील मरी, बुगती आणि मंगल या जमातींमधील तरुणांचा समावेश आहे.