
वॉशिंग्टन : गेल्या १५ दिवसांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लागू केलेला आयात कर तब्बल ८ पट वाढवला आहे. ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी उशिरा जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार आता चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर तब्बल २४५ टक्के आयात कर लागू असेल. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध अधिकाधिक चिघळत असून त्यामुळे दोन्ही देशांमधील आयात वस्तू दिवसेंदिवस महाग होऊ लागल्या आहेत.
चीनने ट्रम्प यांनी लागू केलेल्या ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेवर १२५ टक्के आयात कर लागू केल्यानंतर त्यावर अमेरिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार आता चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर तब्बल २४५ टक्के आयात कर लागू असेल. चीनकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांचा परिणाम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल म्हणजे व्यापारात अमेरिकेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या धोरणाचाच एक भाग आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या परिस्थितीचे खापर ट्रम्प प्रशासनाने चीनवर फोडले आहे. चीनने हेतुपुरस्सर तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या अनेक महत्त्वाच्या सामग्रींच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. यात गॅलियम, जर्मेनियम आणि अँटिमनी अशा गोष्टींचा समावेश आहे. लष्करी साहित्य, अवकाशविषयक साहित्य व सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी हे साहित्य अत्यावश्यक ठरते, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. नुकतेच चीनने सहा प्रकारच्या दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरदेखील अशाच प्रकारचे निर्बंध घातल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.
अनेक स्तरांवर विपरित परिणाम
या टॅरिफमुळे मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी, लष्करी उपकरणे आणि स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ धातूंवर कर लागू होणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांपासून ते तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत अनेक स्तरांवर याचा विपरित परिणाम जाणवणार आहे.
दोन्ही देश इरेला पेटले
चीन व अमेरिका यांच्यातील ‘टॅरिफ वॉर’चा परिणाम म्हणून दोन्ही देश एकमेकांवर लागू असणाऱ्या करात टप्प्याटप्प्याने वाढ करत आहेत. अमेरिकेकडून सर्वात आधी चीनवर ३४ टक्के समन्यायी व्यापार कर अर्थात ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करण्यात आला होता. त्यानंतर त्यात ५० टक्क्यांची वाढ करून तो ८४ टक्के केला. यानंतर १२४ टक्के, १४५ टक्के आणि आता थेट २४५ टक्क्यांपर्यंत हे कर वाढवण्यात आले आहेत. दुसरीकडे चीनकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उत्तर देत राहू, असे चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ६८ टक्के असणारा आयात कर चीनने आता थेट १२५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.