
वॉशिंग्टन : अमेरिकेने ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए) आणि तिची सशस्त्र शाखा असलेल्या ‘माजीद ब्रिगेड’चा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या यादीत केला आहे.
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहेत. महिनाभरात असीम मुनीर यांना दोनदा अमेरिकेत आमंत्रित केल्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि तिच्या ‘माजीद ब्रिगेड’ या गटाचा समावेश ‘परदेशी दहशतवादी संघटनां’च्या (एफटीओ) यादीत केला आहे. अमेरिकेच्या या कृतीचा मोठा फायदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार आहे.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तान दहशतवादाचा सूत्रधार नसून, तो स्वतःच त्याचा बळी ठरला आहे, हा इस्लामाबादचा दावा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही काळात ट्रम्प सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णत: बदलले आहे. अमेरिका अलीकडे पाकिस्तानची तळी उचलून धरत असून भारताला लक्ष्य केले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या वचनबद्धतेचे हा निर्णय प्रतीक आहे, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ‘बीएलए’ची शाखा असलेल्या ‘माजीद ब्रिगेड’लाही परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.