
वॉशिंग्टन डीसी : भारताला टॅरिफचा तडाखा देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मात्र दिलासा दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा चीनवर अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांनी अमेरिका-चीन टॅरिफची अंतिम मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या कार्यकारी आदेशावर सोमवारी रात्री स्वाक्षरी केली आहे.
अमेरिकेने लागू केलेली करसवलत मंगळवारी संपणार होती. अमेरिकेने सध्या चीनवर ३० टक्के टॅरिफ लागू केला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये बऱ्याच काळापासून करयुद्ध सुरू होते. ट्रम्प यांनी चीनवर २४५ टक्के कर लादण्याची धमकी दिली होती. चीननेही अमेरिकेला जशास तसे उत्तर देत, १२५ टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. मात्र, जिनेव्हा व्यापार करारानंतर हे लागू झाले नाही. चीनवर कर लावण्याविषयी ट्रम्प म्हणाले की, “चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. ते खूप चांगले काम करत आहेत. आता चीनवर किती कर लावला जातो, ते बघूया.”