

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ने (डीएचएस) तीव्र निषेध आणि वादानंतर आपल्या एक्स अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट हटवली आहे. या पोस्टमध्ये ट्रान्सफॉर्मर्स-थीमचे एक कार्टून वापरून एका भारतीय शीख व्यक्तीला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावर "आमच्या रस्त्यांवरून चालते व्हा, तुम्हाला गाडी चालवता येत नाही मिस्टर सिंग" असा संदेश लिहिण्यात आला होता.
या हटवलेल्या पोस्टमध्ये दाढी आणि डोक्यावर कपडा बांधलेल्या एका व्यक्तीसमोर 'ऑप्टिमस प्राइम' हे ट्रान्सफॉर्मर्सचे पात्र दाखवण्यात आले होते, ज्याच्या आर्मरवर डीएचएसची अधिकृत मुद्रा होती. या पोस्टरवर "स्वतःहून देश सोडा, अन्यथा परिणामांना सामोरे जा" असेही लिहिले होते.
एका अहवालानुसार, या प्रतिमेवर अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन संघटना आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ही पोस्ट शीख-अमेरिकन समुदायाविरुद्ध वर्णद्वेष पसरवणारी असून 'सिंग' हे अडनाव लावणाऱ्या लाखो लोकांचा अपमान करणारी आहे, असा आरोप त्यांनी केला.
डीएचएसचे स्पष्टीकरण
या वादावर स्पष्टीकरण देताना डीएचएसने एका निवेदनात सांगितले की, या ग्राफिक्समध्ये हरजिंदर सिंग नावाच्या भारतीय नागरिकाचा संदर्भ देण्यात आला होता. फ्लोरिडा टर्नपाइकवर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता, ज्या प्रकरणात हरजिंदर सिंगवर सदोष मनुष्यवधाचे गंभीर आरोप आहेत.