विदेशातून आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के कर लावणार - डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जगभरातील ऑटो सेक्टरमध्ये खळबळ
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्पसंग्रहित छायाचित्र
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ वॉर' सुरू केले असून त्याचा पुढील अध्याय बुधवारी पाहावयास मिळाला. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या कार व कारच्या सुट्या भागांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाइट हाऊसने याबाबत एक आदेश जारी करत विदेशातून आयात होणाऱ्या वाहनांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातील ऑटो सेक्टरमध्ये खळबळ उडाली असून यामुळे अमेरिकेमध्ये विदेशी वाहनांच्या किमती वाढणार आहेत.

सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एकामागोमाग एक धडाकेबाज निर्णय घेत आहेत. अमेरिकेतील निर्वासितांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासह त्यांनी जगभरात 'टॅरिफ वॉर' सुरू केले. अमेरिकेच्या वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या शुल्काएवढेच शुल्क विदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आता त्यांनी विदेशातून आयात होणाऱ्या कार व कारच्या सुट्या भागांवर २५ टॅरिफ लावण्याची घोषणा केली. हा उपाय कायमस्वरूपी असणार असून २ एप्रिलपासून हा निर्णय लागू होईल आणि ३ एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे ट्रम्प यांनी सांगितले.

... तर कर नाही

अमेरिकेत निर्मिती न झालेल्या सर्व गाडयांवर आम्ही २५ टक्के कर आकारणार आहोत. हा कर कायमस्वरूपी असणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये महणाले. या निर्णयामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच जर वाहनांचे उत्पादन अमेरिकेत घेणार असाल तर त्याला कोणताही कर लावणार नाही, असेही ट्रम्प महणाले.

निर्णयावर टीका

दरम्यान, युरोपीय संघाचे प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे. सर्व वाहनांवर २५ टक्के कर लावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल मला वाईट वाटते. मात्र, आपल्या आर्थिक हितांचे रक्षण करताना चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असेही ते महणाले.

एलन मस्क यांना थेट फायदा

विदेशातून आयात होणाऱ्या वाहनांवर कर वाढवण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा एलन मस्क यांना होणार आहे. एलन मस्क 'टेस्ला' या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीच्या वाहनांचे उत्पादन कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये होते. ट्रम्प प्रशासनाने देशातच बनणाऱ्या वाहनांवर कोणताही कर आकारणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याचा थेट फायदा 'टेस्ला' ला होईल.

logo
marathi.freepressjournal.in