अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा ट्रम्प! डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांनी दिली कडवी झुंज

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वर्षानंतर पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएफपी
Published on

वॉशिंग्टन : अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वर्षानंतर पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी त्यांना कडवी लढत दिली, मात्र त्यांचा पराभव झाला. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या ट्रम्प यांनी देशाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन देशवासीयांना दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी ट्रम्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी लागणारी २७० इलेक्टोरल मते ट्रम्प यांना मिळाली, तर कमला हॅरिस यंना २२४ मते मिळाली. आता अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू झाले आहे, देशवासीयांनी आमच्या पारड्यात भरभरून मते टाकली आहेत, असे ट्रम्प यांनी आपले कुटुंबीय आणि समर्थकांनी केलेल्या जल्लोषाच्यावेळी सांगितले.

अमेरिकेच्या जनतेचा हा भव्य विजय आहे, यापूर्वी कधीही अनुभवता आला नाही असा हा क्षण आहे, ही घटना सार्वकालिक मोठी राजकीय घडामोड आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण देशाला मदत केली पाहिजे, ज्याला मदतीची गरज आहे असा आपला देश आहे, देशाला मदतीची गरज आहे. आपल्याला अध्यक्षपदी विराजमान करून असामान्य बहुमान दिल्याबद्दल ट्रम्प यांनी देशवासीयांचे आभार मानले. आता आपण तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबीयांसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढणार आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत दरदिवशी आपण लढा देत राहणार आहोत, अमेरिका सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि समृद्ध होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि मिशिगन या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाकडून कडवी झुंज पाहायला मिळाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये मुसंडी मारली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची राजकीय समीकरणे बिघडवली. पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया ही महत्त्वाची मोक्याची राज्ये (स्विंग स्टेट्स) रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाकडून खेचून आणली. नॉर्थ कॅरोलिना या आणखी एका नर्णायक राज्यात ट्रम्प यांनी विजय मिळवला.

अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले होते. ट्रम्प यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचेही बोलले जात होते. त्यानंतर ट्रम्प यांनी निवडणूक निकालास आ‌व्हान दिले होते आणि अमेरिका कॅपिटलवर चाल करून जाण्याचे अप्रत्यक्ष आदेश समर्थकांना दिले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकामुळे जग हादरले होते.

प्रचारादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी मध्यमवर्गाला दिलासा देण्यावर भर दिला. अमेरिकेतील १०० दशलक्ष लोकांना दिलासा देण्यासाठी कर सवलत देणे, परवडणारी घरे देणे, महिलांच्या गर्भपातावरील बंदी उठविण्यासारखी आश्वासने कमला हॅरिस यांनी दिली होती. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची घोषणा केली होती. विदेशी वस्तूंवर अधिक कराची आकारणी, ऊर्जा निर्मितीमधील खर्च कमी करणे, अशा प्रकारची आश्वासने ट्रम्प यांनी दिली होती.

नवा तारा, एलॉन मस्क

दरम्यान, या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘स्पेसएक्स’चे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचा ‘नवा तारा’ असा उल्लेख केला आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले. फ्लोरिडात झालेल्या वेस्ट पाम बीच परिसरात ट्रम्प यांनी केलेल्या भाषणात त्यांनी मस्क यांचा उल्लेख केला. आपल्याकडे मस्क यांच्या रुपात एक नवा तारा आहे, ते अत्यंत हुशार आहेत. अशा हुशार लोकांचे आपण जतन केले पाहिजे, असे ट्रम्प म्हणाले.

युद्ध थांबवणार

ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले तर ते जगात युद्ध घडवून आणतील, अशी टीका डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्यावर ट्रम्प यांनी भाष्य केले. आपल्याला सुरक्षित सीमा हव्या आहेत. आपल्याला समर्थ लष्कर हवे आहे, पण आपल्याला ते कधीही वापरायची गरज पडणार नाही. आपण युद्ध केलेले नाही. ते म्हणतात मी युद्ध सुरू करेन, पण मी युद्ध सुरू करणार नाही, तर मी युद्ध थांबवेन, असे ट्रम्प म्हणाले.

व्हर्जिनिया आणि संपूर्ण ईस्ट कोस्टमधून निवडून येणारे वकील सुहास सुब्रह्मण्यम हे त्या भागातील पहिले भारतीय अमेरिकन ‘स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह’ ठरले आहेत. स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह हे पद भारतातील आमदाराच्या समकक्ष असते. सुब्रह्मण्यम यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माईक क्लॅन्सी यांचा पराभव केला. ते सध्या व्हर्जिनिया राज्याचे सिनेटर आहेत.

व्हर्जिनियाच्या १० व्या जिल्ह्यातील लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला याबाबत मी आभारी आहे. हा जिल्हा माझे घर आहे. मी येथे विवाह केला, माझी पत्नी मिरांडा आणि मी येथे आमच्या मुलींचे संगोपन करत आहोत आणि आमच्या समुदायाला भेडसावणाऱ्या समस्या आमच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आहेत. वॉशिंग्टनमध्ये या जिल्ह्याची सेवा करत राहणे हा सन्मान आहे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले. सुब्रमण्यम यांनी यापूर्वी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे व्हाईट हाऊस सल्लागार म्हणून काम केले होते. ते हिंदू असून देशभरातील भारतीय अमेरिकन लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार हे सर्व पाच विद्यमान भारतीय अमेरिकन सदस्य प्रतिनिधीगृहात पुन्हा निवडून आले आहेत. तसेच सुब्रह्मण्यमही निवडून गेल्याने आता त्यांची संख्या सहा झाली आहे. तर, ॲरिझोनाच्या पहिल्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमध्ये डॉ. अमिश शाह हे कमी फरकाने आघाडीवर असल्याने प्रतिनिधीगृहात भारतीय अमेरिकन लोकांची संख्या सातपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

ठाणेदार यांचा पुन्हा विजय

ठाणेदार हे मिशिगनच्या १३ व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून सलग दुसऱ्यांदा निवडून आले. २०२३ मध्ये ते पहिल्यांदा ही निवडणूक जिंकले होते. तर, राजा कृष्णमूर्ती यांनी सलग पाचव्यांदा इलिनॉयचा सातवा काँग्रेसनल जिल्हा जिंकला आहे. त्याचप्रमाणे कॅलिफोर्नियाच्या सतराव्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रो खन्ना आणि काँग्रेस वुमन प्रमिला जयपाल या वॉशिंग्टन राज्यातील सातव्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. अमी बेरा हे २०१३ पासून कॅलिफोर्नियाच्या सहाव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ भारतीय अमेरिकन काँग्रेस सदस्य आहेत. ते सलग सातव्यांदा पुन्हा निवडून आले.

पराभवानंतर कमला हॅरिस यांचे रात्रीचे भाषणही रद्द

निकाल हळूहळू स्पष्ट होत असल्याने कमला हॅरिस यांनी रात्री आयोजित केलेली सभा रद्द केली आहे. कमला हॅरिस यांचे सल्लागार म्हणाले की, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस इलेक्शन नाईटमध्ये बोलणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in