बिश्नोई टोळीविरुध्द अमेरिकेत कारवाई

लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात अमेरिकेने कायदेशीर बडगा उगारला आहे. अमेरिकन प्रशासनाने 'ऑपरेशन हार्ड बॉल'अंतर्गत तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोई व त्याचा उत्तर अमेरिकेतील म्होरक्या गोल्डी ब्रार आणि विरोधी टोळीचा प्रमुख जगदीप सिंग ऊर्फ जग्गू भगवानपुरिया यांच्यासह आंतरराष्ट्रीय टोळीच्या ३७ सदस्यांविरोधात लॉस एंजेलिसमधील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
बिश्नोई टोळीविरुध्द अमेरिकेत कारवाई
बिश्नोई टोळीविरुध्द अमेरिकेत कारवाई
Published on

आशिष सिंग/मुंबई

लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात अमेरिकेने कायदेशीर बडगा उगारला आहे. अमेरिकन प्रशासनाने 'ऑपरेशन हार्ड बॉल'अंतर्गत तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोई व त्याचा उत्तर अमेरिकेतील म्होरक्या गोल्डी ब्रार आणि विरोधी टोळीचा प्रमुख जगदीप सिंग ऊर्फ जग्गू भगवानपुरिया यांच्यासह आंतरराष्ट्रीय टोळीच्या ३७ सदस्यांविरोधात लॉस एंजेलिसमधील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

अमेरिकेच्या भूमीवर जागतिक पातळीवरील गुन्हेगारी नेटवर्क चालवल्याबद्दल भारतीय गुन्हेगारी टोळीवर फेडरल वकिलांनी अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या समांतर कारवाईत अमेरिकेची गुप्तहेर संघटना ‘एफबीआय’ने गोल्डी ब्रारचे नाव ‘मोस्ट वॉन्टेड’ फरार गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट केले असून त्याच्या अटकेसाठी ५० हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच १ जुलैला त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या दोषारोपपत्रात बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी १८ जून २०२३ रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जरची हत्या घडवून आणल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयीन नोंदींमध्ये या पीडित व्यक्तीचे नाव लपवून 'एच.एस.एन.' असे लिहिले असले, तरी घटनास्थळ, वेळ आणि तपशील थेट निज्जरच्या हत्येशी जुळणारे आहेत.

निज्जर हत्येमागे भारताचा सहभाग नसल्याचे नमूद

बिश्नोई टोळीकडून कॅलिफोर्नियातील व्यावसायिकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यासाठी आणि श्रीमंत भारतीय डायस्पोरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी निज्जरची हत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या हत्येमध्ये भारत सरकारचा कोणताही सहभाग किंवा माहिती नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले असून, हा हल्ला पूर्णपणे बिश्नोई टोळीच्या खंडणी आणि वर्चस्व विस्ताराच्या रणनीतीचा भाग होता, असे नमूद केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in