
वॉशिंग्टन : भारतासह जगभरातील देशांना टॅरिफचा दणका देणाऱ्या अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली आहे. सत्ताधारी व विरोधकांमधील मतभेदांमुळे नव्या वर्षाच्या सरकारी खर्चाला मंजुरी न मिळाल्यामुळे अमेरिका शटडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेत १ ऑक्टोबर २०२५च्या मध्यरात्रीपासून सरकारी कामकाज ठप्प होणार आहे. याचा मोठा फटका सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना बसणार आहे.
अमेरिकेत सरकारी कामकाजाचे वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू होते. त्यापूर्वी सरकारला पुढील वर्षीच्या खर्चाच्या तरतुदींना काँग्रेसची मंजुरी मिळवावी लागते. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारला ही मंजुरी मिळवता आलेली नाही. ट्रम्प सरकारची खर्चकपातीची धोरणे यासाठी कारणीभूत ठरली आहेत. सरकारी खर्चात कपात करण्याच्या प्रयत्नात ट्रम्प यांनी आरोग्य सेवेसह अनेक महत्त्वाच्या योजनांवरील खर्चांना कात्री लावली आहे. या योजना मागे घेण्याची मागणी करत डेमॉक्रॅटिक पक्षाने फंडिंग बिल रोखले आहे. बिल मंजुरीसाठी ६० सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाकडे काँग्रेसमध्ये ५३ सदस्य आहेत. त्यांना डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे. हा पक्ष माघार घेण्यास तयार नसल्याने फंडिंग बिल रखडले आहे. त्यातून शटडाऊनचे संकट उभे राहिले आहे. प्रशासन सिनेटमध्ये आवश्यक फंडिंग विधेयक पास करण्यात अपयशी ठरल्याने अधिकृतपणे ‘सरकारी शटडाऊन’ सुरू झाले आहे. संघीय सरकारला निधी मिळणे थांबल्यामुळे याचा थेट परिणाम सरकारी कामकाजावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
सरकारी शटडाऊनचा सुमारे ८ लाख कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होईल. अतिमहत्त्वाच्या सेवेत नसलेल्या कामगारांना विनावेतन रजेवर पाठवले जाईल किंवा तात्पुरते काम थांबवावे लागेल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम करत राहतील, परंतु त्यांना पगार मिळणार नाही. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, सामाजिक सुरक्षा सेवा, हवाई वाहतूक नियंत्रण, पोस्ट व लष्करासह सुरक्षेसंबंधीची सर्व कामे व सेवा सुरू राहतील. राष्ट्रीय उद्याने आणि संग्रहालये, अन्न सुरक्षा तपासणी, इमिग्रेशन कोर्ट, नवीन पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रिया कोलमडेल.
शटडाऊन म्हणजे काय?
अमेरिकेत ‘सरकारी शटडाऊन’ हा घटनात्मक प्रक्रियेचा भाग आहे. अमेरिका सरकारला नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी राष्ट्रीय खर्चाची बिले मंजूर करून घेता आली नाहीत तर कामकाज बंद ठेवावे लागते. काँग्रेसने फंडिंग बिल मंजूर करेपर्यंत शटडाऊन सुरू राहते. अशा परिस्थितीत अनेक सरकारी सेवांचा निधी थांबतो. त्यामुळे या सेवा तात्पुरत्या बंद राहतात. गेल्या ४० वर्षांत अमेरिकेत १० पेक्षा जास्त वेळा शटडाऊन झाले आहेत. अमेरिकेत सरकारी शटडाऊन होणे साधारण बाब बनत चालली आहे. १९९५ पासून आतापर्यंत अमेरिकेत सहा वेळा सरकारी शटडाऊन झाले आहे. ट्रम्प यांच्या याआधीच्या कार्यकाळात तीन वेळा अशीच परिस्थिती ओढवली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा सरकारी शटडाऊन झाले होते.
३५ दिवस शटडाऊन
ट्रम्प यांच्या कार्यकाळातच अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे शटडाऊन झाले होते. त्यावेळी सलग ३५ दिवस सरकारचे कामकाज पूर्णपणे बंद होते. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीपासून अमेरिकन सीनेटने सरकारचा निधी पुरवठा बंद केला आहे. यामुळे तिथे शटडाऊन झाले आहे. याआधी २२ डिसेंबर २०१८ ते २५ जानेवारी २०१९ पर्यंत सलग ३५ दिवस अमेरिकेत शटडाऊन झाले होते. तीन वेळा एकट्या ट्रम्प यांच्या कार्यकाळात ही स्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या आधी बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात दोन वेळा शटडाऊन झाले होते. १९९५ मध्ये क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात २१ दिवसांसाठी अमेरिकन सरकारचे काम बंद झाले होते. याआधी त्यांच्याच कार्यकाळात ५ दिवसांसाठी शटडाऊन झाले होते.