

वॉशिंग्टन : अमेरिकेने ‘एच १ बी’ व्हिसा मुलाखती थांबवल्या असून, जानेवारीपासून तब्बल ८५ हजार व्हिसा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेने अवैध स्थलांतराचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतला आहे. परिणामी स्थलांतराचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या नवीन सोशल मीडिया तपासणी धोरणामुळे ‘एच-१बी’ व्हिसा अर्जदारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक बदलण्यात आले किंवा पुढे ढकलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील अमेरिकेच्या दूतावासानेदेखील या अर्जदारांसाठी सूचना जारी केली आहे.
दूतावासाने काय म्हटले
दूतावासाने स्पष्ट इशारा दिला की, अर्जदारांनी त्यांच्या पूर्वीच्या ठरलेल्या मुलाखतीच्या तारखेला दूतावासात किंवा वाणिज्य दूतावासात आल्यास त्यांना प्रवेश नाकारला जाईल. एका ‘एक्स’ पोस्टमध्ये दूतावासाने म्हटले आहे की, जर तुम्हाला तुमची व्हिसा मुलाखतीची तारीख बदलल्याबद्दल ईमेल प्राप्त झाला असेल, तर मिशन इंडिया तुमच्या नवीन मुलाखतीच्या तारखेसाठी तुम्हाला मदत करण्यास उत्सुक आहे.
व्हिसा रद्द प्रकरणांमध्ये वाढ
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या वर्षात व्हिसा रद्द करण्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ केली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये परराष्ट्र विभागाने नमूद केले आहे की, जानेवारीपासून ८५,००० व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. या पोस्ट्सवरून हे स्पष्ट होते की, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने स्थलांतर, व्हिसा नियमांचे पालन आणि राष्ट्रीय सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. परराष्ट्र विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, यात ८,००० हून अधिक विद्यार्थी व्हिसा आहेत.