इराणवर इस्त्रायलच्या मोठ्या हल्ल्याची गुप्त माहिती फुटली; सीक्रेट कागदपत्रे 'लीक' झाल्याने खळबळ

इराणवर इस्त्रायल मोठा हल्ला करणार होता. या हल्ल्याची माहिती अमेरिकेतील गुप्त कागदपत्रातून फुटल्याने खळबळ माजली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रReuters
Published on

वॉशिंग्यन : इराणवर इस्त्रायल मोठा हल्ला करणार होता. या हल्ल्याची माहिती अमेरिकेतील गुप्त कागदपत्रातून फुटल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी अमेरिकेने सुरू केली आहे. सध्या पश्चिम आशियात इस्त्रायलचे गाझा व लेबनॉनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यानंतर इस्त्रायलने इराणवर हल्ल्याची तयारी सुरू केली होती.

इराणने इस्त्रायलवर १ ऑक्टोबरला १८० क्षेपणास्त्रे डागली होती. त्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इस्त्रायलने केली होती. इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या इस्त्रायलची गुप्त कागदपत्रे फुटली आहेत. या कागदपत्रानुसार, इस्त्रायलने या हल्ल्यासाठी शस्त्रास्त्रांची वाहतूक सुरू केली. दुसऱ्या एका कागदपत्रात इस्त्रायलच्या हवाई दलाच्या सरावाची माहिती आहे. यात हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती आहे. हा सराव इराणवर हल्ल्याच्या तयारीचा एक भाग आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त कागदपत्रे फुटणे अमेरिकेत गंभीर चिंतेचा विषय आहे. या कागदपत्रांवर १५ व १६ ऑक्टोबरची तारीख लिहिली आहे. १८ ऑक्टोबरला 'टेलिग्राम'वर 'मीडिल इस्ट स्पेक्टेटर' नावावरील चॅनेलने ही माहिती पोस्ट केली. ही कागदपत्रे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड व ब्रिटनसाठी आहे. हे सर्व देश 'फाईव्ह आईज' या गुप्तचर नेटवर्कचा एक भाग आहेत. ही गुप्त कागदपत्रे कोणाकोणापर्यंत पोहचली आहेत, याचा तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in