अमेरिकेत अंतर्गत धुसफूस; ‘इराणकडून धोका नव्हता’ असे सांगत अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखाचा राजीनामा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखाचा राजीनामा
अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखाचा राजीनामा
Published on

वॉशिंग्टन/तेहरान : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता अमेरिकन सैन्यदल व प्रशासनात या युद्धावरून अंतर्गत धुसफूस सुरू झाली असून, ‘इराणकडून कोणताही तत्काळ धोका नव्हता’. असे म्हणत अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाचे संचालक जो केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग मोकळा करण्यासाठी मदत करण्याची अमेरिकेची विनंती ‘नाटो’ देशांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे या युद्धात जगातील महासत्ता अमेरिका एकाकी पडल्याचे चित्र आहे.

“इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाला माझा पाठिंबा असू शकत नाही. आपल्या राष्ट्राला (अमेरिका) कोणताही तत्काळ धोका नव्हता आणि इस्रायल व त्यांच्या शक्तिशाली अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे आम्ही हे युद्ध सुरू केले,” असे सांगत अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक जो केंट यांनी मंगळवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावर व्हाइट हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

“इराण युद्ध हे एका नियोजित चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेचा भाग आहे. इस्रायली अधिकारी आणि अमेरिकन मीडियातील काही घटकांनी ट्रम्प यांची दिशाभूल केली. ज्याप्रमाणे अमेरिकेला इराक युद्धाच्या संकटात ओढले गेले होते, त्याच रणनीतीचा वापर करून आता इराणविरोधात युद्ध लादले गेले आहे,” असा दावा केंट यांनी केला. जो केंट हे स्वतः एक माजी सैनिक असून त्यांनी ११ वेळा युद्धभूमीवर सेवा बजावली आहे.

दुसरीकडे, युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनीमार्गे अख्ख्या जगाचा तेलपुरवठा थांबवल्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्रही असून त्यांनी आता आपल्या सहयोगी ‘नाटो’ देशांना होर्मुझचा मार्ग मोकळा करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर ‘नाटो’ देशांनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यास मदत केली नाही, तर त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या धमकीला न जुमानता ‘नाटो’ देशांनी अमेरिकेची ही विनंती फेटाळून लावली आहे. हे युद्ध आमचे नाही, असे म्हणत युरोपियन देशांनी हात वर केले आहेत. जर्मनी, इटली आणि ब्रिटनने याप्रकरणी कोणतीही मदत करण्यास ट्रम्प यांना नकार दिला आहे.

जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज म्हणाले की, “आम्ही कोणत्याही लष्करी कारवाईत भाग घेणार नाही. याप्रकरणी कधीही कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे जर्मनीच्या लष्करी योगदानाचा प्रश्नच उद्भवत नाही. इराणचे सध्याचे सरकार संपले पाहिजे, परंतु बॉम्बफेक करून त्याला झुकवणे हा योग्य मार्ग नाही.” ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की, “त्यांचा देश या मोठ्या युद्धात अडकणार नाही. तेल बाजार स्थिर ठेवण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडणे आवश्यक आहे, परंतु हे सोपे काम नाही.” इटलीचे परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी म्हणाले की, “या संकटावर चर्चेतूनच तोडगा काढला पाहिजे आणि त्यांचा देश कोणत्याही नौदल मोहिमेचा विस्तार करण्याच्या बाजूने नाही.”

इस्रायली हल्ल्यात बसिज दलाचे ३०० सैनिक ठार

तेहरान टाइम्समधील एका वृत्तानुसार, रात्री झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणच्या बसिज दलाचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे ३०० कमांडर आणि फील्ड अधिकारी ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमध्ये बसिजची प्रमुख कमांड सेंटर्स आणि ऑपरेशनल तळांना लक्ष्य करण्यात आले होते. सरकारविरोधी निदर्शने आणि आंदोलने दडपण्यासाठी अनेकदा बसिज दलाचाच वापर केला जातो.

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी हल्ल्यात ठार

इस्रायलने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी ठार झाले आहेत, असा दावा इस्रायलने केला आहे. लारीजानी हे इराणच्या प्रशासनातील एक प्रमुख व्यक्ती मानले जात होते. लारीजानी हे अयातुल्ला खामेनी यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. इराणच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्ला खामेनी हल्ल्यात मारले गेल्यानंतर अली लारीजानी हेच इराणची सूत्रे पडद्यामागून हलवत होते. इस्रायली सैन्याने बसिज पॅरामिलिट्री मिलिशियाचे प्रमुख घोलामरेजा सुलेमानी आणि त्यांचे डेप्युटी सय्यद कारिशी यांनाही मारल्याचा दावा केला आहे.

युद्धविरामाचा प्रस्ताव खामेनी यांनी फेटाळला

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दोन मध्यस्थ देशांद्वारे इराणला पाठवलेले अमेरिकेबरोबरचा तणाव कमी करण्याचे किंवा संभाव्य युद्धविरामाचे प्रस्ताव फेटाळले आहेत, अशी माहिती इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. “शांततेसाठी ही योग्य वेळ नाही. अमेरिका आणि इस्रायलला आधी युद्धात पराभूत करून त्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यास भाग पाडले पाहिजे, तरच शांततेवर चर्चा होऊ शकते,” असे खामेनी यांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in