

इस्लामाबाद : अमेरिका आणि इराण यांच्यात सोमवारी होणाऱ्या बहुचर्चित शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर अनिश्चिततेचे दाट सावट पसरले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना देण्यात आलेल्या लष्करी इशाऱ्यांमुळे ही कोंडी निर्माण झाली असून, बुधवारी संपणाऱ्या दोन आठवड्यांच्या युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने या चर्चेसाठी राजधानी इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली असली, तरी दोन्ही बाजूंनी चर्चेत सहभागी होण्याबाबत संभ्रम कायम आहे.
इराणची सावध भूमिका
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सोमवारी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या पुढील फेरीच्या चर्चेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते म्हणाले, सध्यातरी आमच्याकडे वाटाघाटींचा कोणताही निश्चित आराखडा नाही. अमेरिका राजनैतिक प्रक्रियेबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. बकाई यांनी अमेरिकेवर युद्धबंदीच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे. सोमवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या मालवाहू जहाजावर केलेला हल्ला, इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी आणि लेबनॉनमधील युद्धबंदी लागू करण्यात होणारा विलंब हे अमेरिकेच्या 'दुटप्पी' धोरणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी जहाजाला अमेरिकन नौदलाने लक्ष्य केले आहे. असे असूनही, ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांचे प्रतिनिधी सोमवारी संध्याकाळी वाटाघाटींसाठी इस्लामाबादला पोहोचतील. गेल्या वेळी या चर्चेचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी केले होते.
पाकिस्तानचे प्रयत्न
या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सोमवारी अमेरिका आणि इराणच्या राजदूतांची स्वतंत्र भेट घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. इस्लामाबादच्या 'रेड झोन'मध्ये १०,००० हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सेरेना आणि मॅरियट ही आलिशान हॉटेल्स विदेशी शिष्टमंडळांसाठी रिकामी करण्यात आली आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रविवारी रात्री इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली. सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कीच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शरीफ यांनी प्रादेशिक शांततेसाठी संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे अधोरेखित केले.
कळीचे मुद्दे
११ आणि १२ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या फेरीनंतर दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने वातावरण तापले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, युरेनियम हस्तांतरणाबाबत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि तसा कोणताही विचार नाही. आता बुधवारी युद्धबंदीची मुदत संपण्यापूर्वी दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर येतात की या प्रदेशात पुन्हा संघर्षाचा भडका उडतो, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.
इराणच्या सैन्याचा पूर्ण ताबा आता आयआरजीसीकडे?
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेबद्दल अनिश्चितता असतानाच गेल्या दीड महिन्यापासून अमेरिकेला कडवी लढत देणाऱ्या इराणमध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. इराणच्या सैन्याचा संपूर्ण ताबा आता इस्लामिक रिव्होल्युशरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आयआरजीसीचे कमांडर जनरल मेजर जनरल अहमद वाहिदी आता इराणचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत. देशाच्या सैन्याची सूत्रे आता त्यांच्याच हाती आहेत. अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेबद्दल निर्णय घेण्याचे अधिकारही वाहिदी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हातात गेले आहेत. या सगळ्याला इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांची मूकसंमती असल्याचे समजते.
ओमानचे आखात आणि अरबी समुद्रात इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता थेट संघर्षात रूपांतरित झालाय. अमेरिकेने इराणची एम/व्ही तौस्का ही मालवाहू नौका बळजबरीने जप्त केली; याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन हल्ले चढवलेत. इराणने अमेरिकेच्या या कृतीचा 'समुद्री लुटमार' असे संबोधत तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
नाट्यमय घडामोडी
अमेरिकेच्या मध्यवर्ती कमांडने या वृत्ताला दुजोरा दिला की, त्यांनी इराणचा ध्वज असलेल्या तौस्का या जहाजाचा ताबा घेतला. अमेरिकेच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेने अरबी समुद्रात या जहाजाला अडवले. सहा तास ताकीद देऊनही जहाज थांबले नाही, तेव्हा अमेरिकन नौदलाने त्याची दिशादर्शन यंत्रणा निकामी केली. त्यानंतर अमेरिकन मरिन कमांडो हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जहाजाच्या डेकवर उतरले आणि त्यांनी जहाजावरील संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि जहाज आपल्या ताब्यात घेतले.
इराणचा प्रतिहल्ला
इराणच्या वृत्तसंस्थेनुसार, जहाज जप्त केल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लष्कराने अमेरिकन नौदलाच्या जहाजांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले चढवले. इराणमधील मुख्यालयाने म्हटले आहे की, अमेरिकेची ही कृती म्हणजे 'आक्रमक कृत्य' सशस्त्र लुटमारी'च्या या कृत्याला इराणचे सशस्त्र दल लवकरच अधिक कठोर प्रत्युत्तर देईल, असा इशारा इराणने दिला आहे. अमेरिकेने सध्या लागू असलेल्या युद्धबंदीच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोपही इराणने केला.
या बदलामुळे आता अमेरिकेसोबत चर्चा होण्याची आणि त्यातून मार्ग निघण्याची शक्यता अतिशय धूसर झाल्याचे वॉशिंग्टनमधील थिंक बँक इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरला वाटत आहे. मंगळवारी डेडलाईन संपणार आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्ध पेटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या घडामोडींमुळे जगाची चिंता वाढली आहे.
अनेक नागरिकांचा मृत्यू
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. "इराणच्या न्यायवैद्यक संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं की, युद्धातील मृतांचा आकडा आता किमान ३ हजार ३७५ इतका झाला आहे.
तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान निर्माण झालेल्या संघर्षाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाची वाहतूक करणारे टँकर्स अडकून पडले असून, परिणामी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन क्रूड ऑईल प्रति बॅरल ६.४ टक्क्यांनी वाढून ८७.८८ अमेरिकन डॉलरवर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूड (आंतरराष्ट्रीय मानक) प्रति बॅरल ६.५ टक्क्यांनी वधारून ९६.२५ अमेरिकन डॉलरवर पोहोचले आहे.
आता अमेरिकेची गरज नाही, यूएईने केले स्पष्ट
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईतील मुख्य रणनीतीकार आणि विश्लेषख अब्दुल खालिक अब्दुल्ला यांनी आता आम्हाला अमेरिकेची गरज नाही, असे थेट सांगून टाकले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अमेरिकेची काही लष्करी तळ आहेत. या ठिकाणी अमेरिकेने आपली शस्त्रे तसेच लष्करी जवान तैनात केलेले आहेत. परंतु आता आम्ही आमचे संरक्षण स्वत: करू शकतो. आम्हाला अमेरिकेची गरज नाही, अशा आशयाचे मत अब्दुल खालिक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकन लष्करी तळ आता आमच्यासाठी रणनीतीविषयक फायदा ठरण्याऐवजी एका प्रकारचे ओझे झाले आहे, असे ते म्हणाले.