

इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमधील दोन आठवड्यांचा युद्धविराम संपत असतानाच दोन्ही देशांनी पुन्हा चर्चेचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येच ही चर्चा होणार असल्याची माहिती दोन प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबाफ आपापल्या पथकाचे नेतृत्व करण्यासाठी बुधवारी पहाटे इस्लामाबादमध्ये पोहोचणार असल्याचे मध्यस्थांनी सांगितले.
८ एप्रिल रोजी सुरू झालेला युद्धविराम बुधवारी संपणार आहे. करार झाला नाही तर मोठ्या प्रमाणावर हल्ले होतील', असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे, तर दुसरीकडे इराणच्या मुख्य वाटाघाटीकाराने रणभूमीवर अद्याप उघड न केलेले नवे पत्ते आपल्याकडेच असल्याचे म्हटले आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून 'युद्धविरामाची मुदत संपण्यापूर्वी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर हजारो जवानांचा खडा पहारा आहे. ही चर्चा यशस्वी झाल्यास युद्धविराम वाढवला जाण्याची शक्यता आहे.
इराणच्या बंदरांवर अमेरिकेने केली नाकाबंदी
इराणने 'हॉर्मुझ सामुद्रधुनी' वरील आपला ताबा कायम ठेवल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर 'ब्रेंट क्रूड' चा दर मंगळवारी प्रति पिंप ९५ डॉलर्सवर पोहोचला असून २८ फेब्रुवारीपासून यात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी केली असून हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरळीत करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली आहे. या मार्गावरून जगातील २० टक्के नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाची वाहतूक होते.
युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये आतापर्यंत ३,३७५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लेबनॉनमधील संघर्षात २,२९० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. इस्रायलमध्ये २३ आणि आखाती देशांमध्ये डझनहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्त्रायल-लेबनॉन चर्चा उद्यापासून
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील ऐतिहासिक राजनैतिक चर्चा गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये पुन्हा सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हिजबुल्लाचे निःशस्त्रीकरण करणे आणि लेबनॉनसोबत शांतता करार करणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
करार न झाल्यास बॉम्बहल्ला- ट्रम्प
वॉशिंग्टन/इस्लामाबाद : दोन आठवड्यांचा शस्त्रसंधीचा कालावधी बुधवारी संपत असून, त्यापूर्वी कोणत्याही करारावर एकमत न झाल्यास इराणवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिली आहे. उभय देशांमधील शांतता चर्चेबाबत अद्याप अनिश्चितता कायम असतानाच ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने दोन्ही बाजूंना शस्त्रसंधी वाढवण्याचे आणि मुत्सद्देगिरीला संधी देण्याचे आवाहन केले आहे.