नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजावर अमेरिकेचा गोळीबार

इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यापारी जहाजावर अमेरिकन लष्कराने शुक्रवारी पुन्हा एकदा गोळीबार केला.
नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजावर अमेरिकेचा गोळीबार
नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजावर अमेरिकेचा गोळीबारप्रातिनिधिक प्रतिमा
Published on

इरबिल/वॉशिंग्टन : इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यापारी जहाजावर अमेरिकन लष्कराने शुक्रवारी पुन्हा एकदा गोळीबार केला. मध्यपूर्वेतील संघर्ष सलग १३ व्या रात्रीही सुरूच राहिल्याने दोन्ही देशांमधील तणाव अधिकच चिघळला आहे.

ओमानच्या आखातात 'एम/टी लाव्हाइन' या व्यापारी जहाजाने अमेरिकेची नाकेबंदी किमान चार वेळा तोडण्याचा प्रयत्न केला. वारंवार सूचना देऊनही जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी आदेश मानले नाहीत. त्यानंतर अमेरिकन सैन्याने जहाजाच्या इंजिन रूमवर गोळीबार करून ते निकामी केले. याआधी १५ जुलै रोजी इराणच्या 'खारग बेटा'कडे जाणाऱ्या 'बेलमा' या तेलवाहू जहाजावरही अमेरिकन विमानाने क्षेपणास्त्र डागून ते निष्प्रभ केले होते.

इराणच्या 'रेव्होल्यूशनरी गार्ड्स'ने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. तसेच इराकमधील इरबिल शहरात अमेरिकन फौजांच्या तळांजवळ ५ स्फोटक ड्रोन्स पाडण्यात आले. तांबड्या समुद्रात सौदीच्या तेल जहाजांवर इराणी पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांनी हल्ले केल्यानंतर, सौदी अरेबियाने येमेनमधील हुदैदा बंदरावर हवाई हल्ले केले.

युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये तब्बल ३,४३४ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद तेथील आरोग्य मंत्रालयाने केली आहे. तसेच या सागरी मार्गावर जवळपास ४०० जहाजांवर सुमारे ६,००० खलाशी अन्नान्न दशेत अडकून पडले आहेत. ट्रम्प यांनी इराणसोबतची चर्चा ही "आतापर्यंतची सर्वात गंभीर चर्चा" असल्याचे म्हटले असले, तरी युद्धाची घाई नसल्याचे सांगत लष्करी कारवाई सुरूच ठेवली आहे. दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेच्या दबावासमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in