विलमिंग्टन : ‘क्वाड’ अधिक मजबूत बनवण्याच्या प्रस्तावानंतर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान हे देश हिंद-प्रशांत क्षेत्रात अधिक मजबूत बनले आहेत. नवीन आव्हाने येतील, जग बदलेल पण ‘क्वाड’ कायम राहील, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यात शनिवारी डेलावेयर येथे ‘क्वाड’ची बैठक झाली.
बायडन म्हणाले की, अमेरिका हा लोकशाही देश असून अमेरिकेचा राष्ट्रपती बनल्यानंतर मी तुम्हाला भेटलो व ‘क्वाड’ आपण अधिक कार्यशील बनवले. ४ वर्षानंतर आता चार देश अधिक मजबूत बनले आहेत.
आम्ही कोणाच्याही विरोधात नाही - मोदी
आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे पाहता प्रत्येक देशाने दुसऱ्या देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे नाव न घेता सांगितले.
मुक्त, खुल्या इंडो-प्रशांत विभागाला आमचे प्राधान्य आहे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. ‘क्वाड’ हा कायम राहणार आहे. ‘क्वाड’च्या देशांनी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यात आरोग्य सुरक्षा, नवीन आधुनिक तंत्रज्ञान, वातावरण बदल, क्षमता बांधणी आदींचा समावेश आहे. सध्या जगात संघर्ष व तणाव वाढलेला असताना ‘क्वाड’चे नेते एकत्रित आले आहेत, असे मोदी म्हणाले.
२०२५ मध्ये भारत ‘क्वाड’चे आयोजन करणार
‘क्वाड’ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन भारत करणार आहे. भारतात ‘क्वाड’ शिखर परिषद आयोजित करण्यात आम्हाला आनंद होईल. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे, असे मोदी म्हणाले.
२९७ प्राचीन वस्तू भारताला सोपवल्या
अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात २९७ प्राचीन भारतीय वस्तू भारताकडे सुपूर्द केल्या आहेत. या वस्तू तस्करी करून देशाबाहेर गेल्या होत्या. २०१४ पासून आतापर्यंत भारताला ६४० प्राचीन वस्तू मिळाल्या आहेत. त्यातील एकट्या अमेरिकेने ५७८ वस्तू भारताला दिल्या आहेत.
सर्व्हिकल कॅन्सरसाठी भारताकडून ७.५ दशलक्ष डॉलर्सची मदत
सर्व्हिकल कॅन्सरच्याविरोधात योगदान म्हणून ‘इंडो-प्रशांत’ क्षेत्रात भारताकडून ७.५ दशलक्ष डॉलर्सचे योगदान देण्यात आले आहे. यात चाचणी, निदान आदींसाठी हा निधी वापरला जाणार आहे.
५ लाख डॉलर्सची शिष्यवृत्तीची घोषणा
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ५ लाख डॉलर्सची ५० क्वाड शिष्यवृत्तीची घोषणा भारताने केली आहे.