मिलवॉकी : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्राणघातक हल्ल्यातून बचावल्यानंतर प्रथमच रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हजेरी लावली. उजव्या कानाला मलमपट्टी लावलेल्या स्थितीत ट्रम्प यांचे आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी आणि पक्षाच्या सदस्यांनी त्यांचे 'फाइटर' अशा घोषणा देत जोरदार स्वागत केले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून देशभरातील रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प यांच्या नावावर यावेळी शिक्कामोर्तब केले. मात्र, उमेदवारी स्वीकारत असल्याची घोषणा ट्रम्प गुरुवारी करणार आहेत.
रिपब्लिकन पक्षातर्फे उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार म्हणून सिनेटर जे. डी. व्हान्स यांचे नाव ट्रम्प यांनी जाहीर करताच समर्थकांनी त्यांचेही जोरदार स्वागत केले.
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे एका जाहीरसभेत गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक गोळी त्यांच्या उजव्या कानाला लागली होती. कानाला झालेल्या जखमेवर मलमपट्टी लावूनच ट्रम्प यांचे अधिवेशनाच्या ठिकाणी आगमन झाले. गायक ग्रीनवूड यांच्यासह व्यासपीठावरील आणि सभागृहातील उपस्थितांनी 'गॉड ब्लेस यूएसए' गायले, तेव्हा ट्रम्प यांनी समर्थकांना हात उंचावून अभिवादन केले.
जो बायडेन यांच्या नावाची अधिकृत घोषणा ऑगस्टमध्ये
अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन हे ट्रम्प यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी असून डेमोक्रॅटिक पक्षातर्फे बायडेन यांच्या नावाची अधिकृत घोषणा ऑगस्ट महिन्यात करण्यात येणार आहे.