

बुसान : अमेरिकेने चीनवर लादलेले टॅरिफ १० टक्क्यांनी कमी केले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे चीनवरील टॅरिफ आता ५७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. त्यानंतर ही घोषणा केली आहे. जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी सांगितले की, चीनवरील कमी केलेले टॅरिफ हे तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. तसेच त्यांनी असेही सांगितले की, चीनवरील फेंटानिलवरील टॅरिफ आता २० टक्क्यांवरून १० टक्के केले जाईल. ट्रम्प म्हणाले की, जिनपिंग हे फेंटानिलचा फ्लो रोखण्यासाठी खूप कठोर मेहनत घेतील आणि हे टॅरिफ कमी करण्यात आले कारण माझा विश्वास आहे की ते खरेच कठोर पावले उचलत आहेत, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
या भेटीच्या आधी ट्रम्प यांनी चिनी मालावर १०० टक्के टॅरिफ शुल्क लादण्याची धमकी दिली होती, पण आता त्यांना असे करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. या बैठकीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आशावाद व्यक्त केला होता की, आमच्यातील बैठक अत्यंत यशस्वी होणार आहे, मला कसलीही शंका नाही. तसेच त्यांनी जिनपिंग हे खूपच चिवट वाटाघाटी करणारे आहेत. कदाचित ते आजच करारावर स्वाक्षरी करू शकतात, असेही ट्रम्प म्हणाले होते.
