

वॉशिंग्टन: व्हेनेझुएलाशी संबंधित आणि अमेरिकेच्या निर्बंधांच्या यादीत असलेल्या दोन तेलवाहू टँकरवर अमेरिकेने उत्तर अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन समुद्रात सलग कारवाया करत ताबा मिळवला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
अमेरिकेच्या युरोपियन कमांडने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ‘अमेरिकन निर्बंधांचे उल्लंघन’ केल्याबद्दल ‘बेला १’ या व्यापारी जहाजावर ताबा घेण्यात आला. मागील महिन्यापासून अमेरिकन यंत्रणा या टँकरचा पाठलाग करत होत्या. व्हेनेझुएलाभोवती निर्बंधित तेलवाहू जहाजांवर लादलेल्या अमेरिकन नाकाबंदीपासून सुटका करण्याचा प्रयत्न या टँकरने केला होता.
यानंतर, होमलँड सिक्युरिटी मंत्री क्रिस्टी नोएम यांनी जाहीर केले की, कॅरिबियन समुद्रात ‘सोफिया’ या दुसऱ्या टँकरवरही अमेरिकन दलांनी नियंत्रण मिळवले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नोएम यांनी सांगितले की ही दोन्ही जहाजे ‘अलीकडेच व्हेनेझुएलात थांबलेली होती किंवा तिकडेच जात होती.’
एका अमेरिकन अधिकाऱ्याने, संवेदनशील लष्करी कारवायांबाबत चर्चा करण्यासाठी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, अमेरिकन लष्कराने ‘बेला १’ ताब्यात घेतल्यानंतर त्याचे नियंत्रण कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
हा टँकर २०२४ मध्ये अमेरिकेने निर्बंधांच्या यादीत टाकला होता. इराण समर्थित लेबनानी लढाऊ संघटना हिजबुल्लाशी संबंधित एका कंपनीसाठी बेकायदेशीरपणे मालाची तस्करी केल्याचा आरोप त्यावर होता. डिसेंबरमध्ये कॅरिबियनमध्ये व्हेनेझुएलाकडे जात असताना अमेरिकन कोस्ट गार्डने या जहाजावर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जहाजाने चढाई नाकारत अटलांटिक महासागर ओलांडण्यास सुरुवात केली.
या काळात ‘बेला १’चे नाव बदलून ‘मॅरिनेरा’ ठेवण्यात आले आणि जहाजाला रशियाचा ध्वज लावण्यात आला, असे शिपिंग डेटाबेसमधून दिसून आले आहे. अमेरिकन अधिकाऱ्याने हेही स्पष्ट केले की जहाजाच्या बाहेरील भागावर कर्मचाऱ्यांनी रशियन ध्वज रंगवला होता.
बुधवारी खुल्या सागरी ट्रॅकिंग संकेतस्थळांवर हे जहाज स्कॉटलंड आणि आइसलंडदरम्यान उत्तरेकडे जात असल्याचे दिसून आले. अमेरिकन अधिकाऱ्याने जहाज उत्तर अटलांटिकमध्येच असल्याची पुष्टी केली.
अमेरिकन लष्करी विमानांनी या जहाजावरून उड्डाण केले असून, मंगळवारी रॉयल एअर फोर्सचे एक पाळत विमानही त्याच परिसरात उडताना फ्लाइट-ट्रॅकिंग संकेतस्थळांवर दिसून आले.
जप्तीपूर्वी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘मॅरिनेरा’ या रशियन तेलवाहू टँकरभोवती निर्माण झालेल्या “असामान्य परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत असल्याचे” सांगितले होते. अधिकृत ‘टास’ वृत्तसंस्थेद्वारे प्रसिद्ध झालेल्या निवेदनात मंत्रालयाने नमूद केले की, “गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन कोस्ट गार्डचे एक जहाज मॅरिनेराचा पाठलाग करत आहे, जरी आमचे जहाज अमेरिकन किनाऱ्यापासून सुमारे ४ हजार किमीवर अंतरावर आहे.”
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अमेरिकन युरोपियन कमांडने स्पष्ट केले की, अमेरिकन फेडरल न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटनुसार, जप्तीपूर्वी ‘मुनरो’ या अमेरिकन कोस्ट गार्ड कटरने या जहाजाचा मागोवा घेतला.
लष्करी कमांडने पुढे सांगितले की ही कारवाई अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या जाहीरनाम्याला पाठिंबा देणारी आहे, ज्यामध्ये पाश्चिमात्य गोलार्धाच्या “सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण करणाऱ्या” निर्बंधित जहाजांना लक्ष्य करण्याचे नमूद आहे. व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे अमेरिकन लष्कराने अचानक रात्री छापा टाकून तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केल्यानंतर काहीच दिवसांत हा टँकर जप्त करण्यात आला आहे.
आम्ही अमेरिकन कायद्याचे पालन करतो!
‘तेलावरील निर्बंधांबाबत आम्ही अमेरिकन कायद्यांची अंमलबजावणी करत आहोत. आम्ही न्यायालयात जातो, वॉरंट मिळवतो आणि तेलवाहू जहाजे जप्त करतो. ही प्रक्रिया पुढेही सुरू राहील, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितले.