
जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला करुन निरागस २६ पर्यटकांना ठार केल्याचा जगभरातील अनेक देश तीव्र निषेध करीत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्यानंतर लगेचच, दहशतवादाविरुद्ध भारताबरोबर अमेरिका ठामपणे उभा आहे, अशी प्रतिक्रिया देत निषेध केला. पण अमेरिकेमधीलच आघाडीच्या वृत्तपत्रांपैकी एक न्यूयॉर्क टाइम्सने या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरलेल्या शिर्षकावरुन संताप व्यक्त होत आहे. आता अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र विषयक समितीनेही (House Foreign Affairs Committee Majority) यावरुन न्यूयॉर्क टाइम्सला झापलंय.
काय आहे न्यूयॉर्क टाइम्सचं शीर्षक?
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातोय. तरी, "काश्मीरमध्ये किमान २४ पर्यटकांना 'हल्लेखोरांनी' (मिलिटंट्स) मारलं", असं शीर्षक न्यू-यॉर्क टाइम्सने वापरलंय. यामध्ये त्यांनी 'दहशतवादी' म्हणण्याऐवजी 'हल्लेखोर' किंवा 'बंदुकधारी' अशा शब्दांचा वापर केला. विदेशी माध्यमांवर भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना कमी महत्त्व देणे, सत्य लपवणे, वेगळा रंग देणे आणि दहशतवाद्यांप्रती सहानुभूती निर्माण करण्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. अशात शीर्षकामध्ये 'हल्लेखोरांनी' (मिलिटंट्स) शब्द वापरुन न्यूयॉर्क टाइम्स घटनेचं गांभीर्य कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप न्यूयॉर्क टाइम्सवर होत आहे.
अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र विषयक समितीने झापलं
अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र विषयक समितीने सोशल मीडिया पोस्टमध्ये न्यूयॉर्क टाइम्सचे शीर्षक एडिट तर केलेच, शिवाय खडेबोलही सुनावले. समितीने शीर्षकातून हल्लेखोर (मिलिटंट्स) हा शब्द हटवून त्याऐवजी मोठ्या अक्षरात लाल रंगामध्ये दहशतवादी असा बदल केला. "न्यूयॉर्क टाइम्स...आम्ही तुमच्यासाठी चूक दुरूस्त करतोय. तो दहशतवादी हल्लाच होता...सिंपल....भारत असो किंवा इस्रायल, जेव्हा दहशतवादाचा प्रश्न येतो, तेव्हा न्यू यॉर्क टाइम्स वास्तवापासून पूर्णपणे दूर जातो" असाही आरोप या समितीने केला.
दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानुसार, अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्यास सुरुवात केली आहे. अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी गर्दी केली असून ते आपल्या मायदेशी जाण्यास निघाले आहेत. यामध्ये काही जण पर्यटक आहेत तर काहीजण वैद्यकीय किंवा इतर कारणांसाठी भारतात आले होते. त्यामुळे अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र पाकिस्तान सरकारनेही अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकविरोधी वातावरण तापले असून देशभरात ठिकठिकाणी तीव्र निषेध आणि आंदोलने केली जात आहेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी कडकडीत बंदही पाळला जात आहे.