इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणच्या ‘आयआरआयएस देना’ या युध्दनौकेवर अमेरिकन पाणबुडीने हल्ला केला. या हल्ल्यात ८७ जण ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर श्रीलंका नौदलाने ३२ जणांना वाचविल्याचा दावा केला आहे.
इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी
इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी
Published on

तेहरान/कोलंबो : श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणच्या ‘आयआरआयएस देना’ या युध्दनौकेवर अमेरिकन पाणबुडीने हल्ला केला. या हल्ल्यात ८७ जण ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर श्रीलंका नौदलाने ३२ जणांना वाचविल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेथ यांनी अमेरिकेने पाणबुडीतून रॉकेट हल्ला करून इराणची युद्धनौका बुडविण्यात आल्याचा दावा केला आहे. पाणबुडीने हल्ला केल्यानंतर इराणच्या जहाजाने समुद्रात जलसमाधी घेतली.

श्रीलंकेच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी नौदलाला अपघाताबद्दल समजले, तेव्हा आकाशात कोणतेही विमान नव्हते. श्रीलंकेच्या नौदलाने दिलेल्या तपशीलानुसार, घटना घडली तेव्हा परिसरात कोणतेही जहाजही नव्हते. समुद्रात बुडालेले जहाज इराणची युद्धनौका होती. मंगळवारी रात्री इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडीद्वारे हल्ला करण्यात आला, तो दुसऱ्या महायुद्धानंतरचा शत्रूवर केलेला पहिला हल्ला होता, असेही हेग्सेथ म्हणाले.

जहाजावर सुमारे १८० खलाशी होते. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. गेल्या महिन्यात भारतातील विशाखापट्टणम येथे झालेल्या २०२६ आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमधून ही इराणी युद्धनौका परतत होती.

श्रीलंका मदतीसाठी कटिबद्ध

या हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला आहे, याबद्दल श्रीलंकेच्या नौदलाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आम्हाला अनेक मृतदेह सापडले आहेत. ते मृतदेह जहाजावर तैनात असलेल्या सैनिकांचे असू शकतात. ही घटना श्रीलंकेच्या सागरी सीमेत घडलेली नाही. पण श्रीलंका मदतीसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले. श्रीलंका नौदलाने जखमी झालेल्या ३२ जणांना वाचवल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या ३२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत इराणच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. 'नौदलाला सकाळी एका जहाजाकडून डिस्ट्रेस कॉल मिळाला, त्यांनी कॉलला उत्तर दिले आणि सकाळी ६ वाजता बचाव अभियान सुरू केले, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in