अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

अमेरिकेने भारतावर १ ऑगस्टपासून तब्बल २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. यामुळे अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तू तेथे महाग होणार असून त्याचा विपरित परिणाम भारताच्या व्यापारावर होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘पोस्ट’ करून या निर्णयाची माहिती दिली.
अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतावर १ ऑगस्टपासून तब्बल २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. यामुळे अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तू तेथे महाग होणार असून त्याचा विपरित परिणाम भारताच्या व्यापारावर होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘पोस्ट’ करून या निर्णयाची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून भारत व अमेरिकेत व्यापार करार होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये यासंबंधी बैठका चालू होत्या. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा करार पूर्ण होईल, असे दावे केले जात होते. मात्र, २९ जुलैपर्यंत हा करार पूर्ण झाला नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी (३० जुलै) अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

"आमचा भारतासोबतचा व्यापार प्रचंड तुटीचा आहे. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्कासोबतच दंडही भरावा लागणार आहे," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेचे एक शिष्टमंडळ पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असून, प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या पुढील फेरीच्या वाटाघाटी तेव्हा होणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात या करारासाठीची पाचवी वाटाघाटीची फेरी गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये पार पडली होती. या चर्चेत भारताचे प्रतिनिधी म्हणून वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल आणि अमेरिकेचे दक्षिण व मध्य आशियासाठीचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच सहभागी झाले होते.

मोदींनी ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केल्यानंतर तत्काळ निर्णय

भारत-पाकिस्तान युद्ध हे आपल्यामुळे थांबले, असा दावा डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने करत असताना भारताने ते नाकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत कोणत्याही जागतिक नेत्याच्या सांगण्यावरुन युद्ध थांबवले नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला. भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये सारे काही आलबेल नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिका संबंध ताणण्यामागे गेल्या काही महिन्यांपासूनच्या घडामोडी कारणीभूत आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे.

भारतीय बाजारपेठेसाठी ट्रम्प यांचे दबावतंत्र

अमेरिकेत तयार होणाऱ्या उत्पादनांना सहजपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळावा यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतावर त्यांनी २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याबाबत केलेली घोषणा त्या दबावतंत्राचाच एक भाग आहे. यापूर्वी दबावतंत्राचा भाग म्हणून चीनसह अन्य देशांवरही अमेरिकेने प्रचंड ‘टॅरिफ’ लादले होते. मात्र, नंतर ते मागे घेतले किंवा निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

राष्ट्रीय हिताचे रक्षण करणार - भारत

सरकार आपल्या शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्याणाचे रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देते. भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील’, अशी प्रतिक्रिया भारताने अमेरिकेच्या ‘टॅरिफ’च्या निर्णयावर रात्री उशिरा दिली.

रशियाकडून शस्त्रे खरेदी केली म्हणून दंडही आकारणार - ट्रम्प

"भारत हा आपला मित्र देश असला तरी, आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यावसाय केला आहे. जगातील सर्वात जास्त आयात शुल्क भारत लादत आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक व्यापार अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे. चीनसह रशियाकडील तेलाचे ते सर्वात मोठे खरेदीदार आहेत. सर्व जग रशियाला युक्रेनमधील विध्वंस थांबवण्यास सांगत असताना या बाबी योग्य नाहीत. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्क तसेच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल", अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे.

logo
marathi.freepressjournal.in