भारतासह अनेक देशांना सुधारायचे आहे! अमेरिकेचे व्यापार मंत्री लुटनिक यांची पुन्हा धमकी

आम्हाला अनेक देशांना सुधारायचे आहे. त्यात भारत, ब्राझील व स्वित्झर्लंडचा समावेश आहे. या देशांनी अमेरिकेला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. या देशांनी अमेरिकेचे नुकसान करणारे निर्णय घेणे बंद केले पाहिजे, अशी धमकी अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी दिली आहे.
भारतासह अनेक देशांना सुधारायचे आहे! अमेरिकेचे व्यापार मंत्री लुटनिक यांची पुन्हा धमकी
Published on

वॉशिंग्टन : आम्हाला अनेक देशांना सुधारायचे आहे. त्यात भारत, ब्राझील व स्वित्झर्लंडचा समावेश आहे. या देशांनी अमेरिकेला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. या देशांनी अमेरिकेचे नुकसान करणारे निर्णय घेणे बंद केले पाहिजे, अशी धमकी अमेरिकेचे व्यापार मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी दिली आहे.

भारत आणि अमेरिकादरम्यान व्यापार चर्चा सुरू असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफवर टॅरिफ लावत आहेत. रशियन तेल खरेदीवरून भारत-अमेरिकेतील संबंध बिघडले आहेत. त्याचवेळी लुटनिक यांच्या अशा वक्तव्याने त्यात तेल ओतले जात आहे.

भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केली पाहिजे. तसेच आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, असा आग्रह लुटनिक यांनी धरला.

लुटनिक म्हणाले की, अमेरिकेच्या आयातीला प्रतिबंध करताना भारत आपल्या बाजारपेठेचा आकार वाढवून सांगतो. भारताकडे १४० कोटींची लोकसंख्या असल्याची फुशारकी मारतो. मग, १४० कोटी लोक अमेरिकेचा मका का खरेदी करत नाहीत. ते आम्हाला सर्व माल विकतात, पण आमचा मका घ्यायला तयार नाहीत. पण, आमच्या प्रत्येक वस्तूवर टॅरिफ लावतात, असा कांगावा त्यांनी केला.

भारताला अमेरिकेसोबत जुळवून घ्यावे लागेल!

लुटनिक म्हणाले की, भारत व्यापार चर्चेवर पुन्हा परत येईल. जगातील सर्वात मोठ्या ग्राहकासोबत भांडण करणे चांगले आहे, असे भारताला वाटते. पण, जेव्हा व्यापाराबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा हे सगळे बंद करावे लागेल आणि अमेरिकेसोबत जुळवून घ्यावे लागेल, असा दम त्यांनी भरला.

ते म्हणाले की, भारत रशियाकडून कमीत कमी दरात तेल खरेदी करत आहे. हे आता अधिक काळ चालणार नाही. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यापूर्वी भारत रशियाकडून २ टक्क्यांपेक्षा कमी तेल खरेदी करत होता. आता तो ४० टक्के कच्चे तेल खरेदी करत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे, असे त्यांनी सांगितले.

ज्या देशांवर ट्रम्प यांनी अधिक टॅरिफ लावला आहे, त्यात भारताचा समावेश आहे. भारतावर पहिल्यांदा २५ टक्के जशास तसा कर, त्यानंतर रशियाकडून तेल खरेदीबाबत अतिरिक्त २५ टक्के दंड लादला आहे. आता ब्रँडेड व पेटंट औषधांच्या आयातीवर १०० टक्के टॅरिफ लावले आहे. त्यामुळे भारतीय औषध कंपन्यांच्या अडचणी वाढत आहेत. भारतीय औषध कंपन्या आपला ४० टक्के महसूल हा अमेरिकन बाजारातून कमावतात.

logo
marathi.freepressjournal.in