
वॉशिंग्टन : भारतात गुन्हेगारी, बलात्कार, दहशतवादाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांनी आणि खास करून महिलांनी भारत दौरा करण्याआधी ही बाब विचारात घेऊन मगच भारताचा दौरा करावा, असा सल्ला अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना दिला आहे. ही ‘ॲडव्हायजरी’ (सूचना सूची) अमेरिकेच्या ‘यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ने पोस्ट केली आहे.
अमेरिकेने नागरिकांसाठी जी ‘ॲडव्हायजरी’ प्रसिद्ध केली आहे, त्यात भारत हा देश क्रौर्याने भरलेला, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण असलेला देश आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच भारतात कधीही दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी स्थिती आहे. ज्या ठिकाणी कायम पर्यटकांचा वावर असतो, ज्या ठिकाणी मोठी वाहतूक व्यवस्था, बाजारपेठ आणि सरकारी सोयीसुविधा असतात अशा ठिकाणी दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना बजावले आहे.
अमेरिकेतील महिलांनी एकटीने भारत दौरा करू नये. कारण बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांसारखे गुन्हे त्यांच्याबाबतीत घडण्याची शक्यता आहे, असेही या ‘ॲडव्हायजरी’त म्हटले आहे.
भारतात जे काही कायदे आहेत ते अमेरिकेतील पर्यटकांनी काटेकोरपणाने पाळले पाहिजेत. सॅटेलाइट फोन, मुदत संपलेला व्हिसा या गोष्टींमुळे तेथील पोलीस तुम्हाला ताब्यात घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंडही भरावा लागू शकतो, असे ‘ॲडव्हायजरी’त नमूद करण्यात आले आहे.
कुठे जाणे धोकादायक?
जम्मू-काश्मीर (लेह आणि लडाखवगळून), भारत-पाकिस्तान सीमाभाग, मध्य आणि पूर्वोत्तर भारत जिथे माओवादी कारवाया होतात असे भाग, मणिपूर, तसेच उत्तर-पूर्व भागातील काही राज्यांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, असे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतील ज्या कर्मचाऱ्यांना भारत दौऱ्यावर पाठवले जात आहे, त्यांना पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि ओदिशा या राज्यांमध्ये पाठवायचे असेल तर आधी विशेष संमती घ्यावी लागेल, असे ‘ॲडव्हायजरी’मध्ये म्हटले आहे.