हुथींच्या तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हल्ले; बंडखोरांकडून बदल्याची धमकी

तांबड्या आणि अरबी समुद्रात सागरी व्यापाराला संरक्षण देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली काही देशांच्या नौदलांनी एकत्र येत ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन नावाने मोहीम सुरू केली.
हुथींच्या तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हल्ले; बंडखोरांकडून बदल्याची धमकी

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांत तांबड्या समुद्राजवळच्या प्रदेशात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमेरिका आणि ब्रिटनने येमेनमधील हुथी बंडखोरांच्या तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा हुथी बंडखोरांनी दिला आहे. दरम्यान, तांबडा समुद्र आणि अरबी समुद्रात हुथी बंडखोर आणि सोमालियातील चाच्यांच्या कारवाया वाढल्याने भारतीय नौदलानेही किमान दहा युद्धनौका या परिसरात तैनात केल्या आहेत.

गाझा पट्टीतील हमास संघटनेप्रमाणेच येमेनमधील हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर हुथी बंडखोरांनी हमासला पाठिंबा व्यक्त करत तांबड्या समुद्राच्या परिसरात इस्रायल आणि अन्य देशांच्या व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि रॉकेटद्वारे हल्ले सुरू केले. हुथी बंडखोरांनी १९ नोव्हेंबर २०२३ पासून विविध देशांच्या २७ जहाजांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक कंपन्यांनी तांबड्या समुद्राचा वापर बंद करून अन्य मार्गांनी वाहतूक सुरू केली.

त्याला प्रत्त्युत्तर म्हणून अमेरिका आणि ब्रिटनच्या सेनादलांनी शुक्रवारी यमेनेमध्ये हुथी बंडखोरांच्या १७ तळांवर हल्ले केले. हल्ल्यात दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांसह, ड्रोन्स आणि पाणबुड्यांनी सहभाग घेतला. अमेरिकेला हल्ल्यांसाठी नेदरलँड्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि बहरीन या देशांनी मदत केली. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी म्हटले आहे की, जागतिक सागरी व्यापारमार्गांचे संरक्षण करण्यास अमेरिका कटिबद्ध आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले की, हे हल्ले मर्यादित स्वरूपाचे आणि स्वसंरक्षणासाठी गरजेचे होते. हुथी बंडखोरांचा लष्करी प्रवक्ता याह्या सरी याने टेलिव्हिजनवरून जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, अमेरिका आणि ब्रिटनने ७२ ठिकाणी बाँबफेक केली. त्यात पाच हुथी बंडखोर ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा हुथी गटाने दिला आहे.

तांबड्या आणि अरबी समुद्रात सागरी व्यापाराला संरक्षण देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली काही देशांच्या नौदलांनी एकत्र येत ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन नावाने मोहीम सुरू केली. त्या अंतर्गत या अमेरिकेच्या मित्रदेशांच्या युद्धनौका व्यापारी जहाजांना संरक्षण पुरवत आहेत. भारताने त्या मोहिमेत सहभागी न होता स्वतंत्रपणे सागरी चाच्यांविरोधात मोहीम राबवली आहे. भारतीय नौदलाने किमान दहा युद्धनौका अरबी समुद्र, एडनचे आखात आणि आसपासच्या प्रदेशात तैनात केल्या आहेत. त्यात आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची, आयएनएस चेन्नई, आयएनएस मार्मुगाव, आयएनएस तलवार, आयएनएस तर्कष आदी युद्धनौकांचा समावेश आहे. तसेच नौदलाची पी-८ आय प्रकारची दीर्घ पल्ल्याची टेहळणी विमाने आणि एमक्यू-९ बी सी-गार्डियन ड्रोन्स या प्रदेशावर गस्त घालत आहेत.

जयशंकर-ब्लिंकेन चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून हुथींचे हल्ले, सागरी व्यापाराची सुरक्षा, हमास-इस्रायल संघर्ष आदी विषयांवर चर्चा केली. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी त्याबद्दल माहिती दिली. चर्चेत जयशंकर यांनी सागरी व्यापारी मार्गांची सुरक्षा निश्चित करण्यासंबंधी भारताच्या चिंता अमेरिकेला समजावून सांगितल्या. दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा केली. यानंतर जयशंकर इराणला भेट देऊन तेथील नेत्यांबरोबर या विषयावर वाटाघाटी करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in