पाककडून ‘हनीट्रॅप’साठी एआय, डीपफेकचा वापर

महाराष्ट्र एटीएसला ‘हनीट्रॅप’चा तपास करताना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा व गौरव पाटील यांच्यातील ९०० चॅट सापडले.
पाककडून ‘हनीट्रॅप’साठी एआय, डीपफेकचा वापर
Published on

आशिष सिंग/मुंबई : भारतात सैन्य दल व महत्त्वाच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांना अडकवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘हनीट्रॅप’चा वापर करतात. भारतातील काही अधिकारी त्याला बळीही पडले आहेत. आता ‘हनीट्रॅप’ करायला पाकिस्तानी हेर यंत्रणेने कृत्रिम बुद्धिमत्ता, डीपफेक यंत्रणेचा वापर करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली. यामुळे एखादा निर्दोष व्यक्तीही ‘हनीट्रॅप’मध्ये अडकण्याची शक्यता आहे.

खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने ‘एआय’ व ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. या हनीट्रॅप प्रोफाईलमध्ये बसवण्यासाठी काल्पनिक पात्रे तयार केली आहेत. यात नागरी व सैन्य आस्थापनांतील कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कंत्राटी कर्मचारी, नोकरशहा, वरिष्ठ पोलीस अधिकारी या जाळ्यात अडकल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांना आढळले आहे.

बुधवारी (दि.१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन डे आहे. त्यामुळे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा याचा वापर करून रोमँटिक किंवा बीभत्स संबंध दाखवू शकतात. यासाठी प्रेम, व्हायरस, चित्रे, चॅट ग्रुपवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा संबंधितांचे प्रोफाईल हॅक करायला पाठवू शकतात. त्यातून संवेदनशील माहिती काढून घेतली जाते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला त्यांच्या ‘टार्गेट’बाबत अचूक माहिती असते. ते त्यांना अत्यंत सहजपणे जाळ्यात ओढतात. गप्पा मारताना ते लैंगिक संबंधाची ऑफर करतात. त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्याच्या फोनमधून आवश्यक ती माहिती चोरतात.

गुप्त माहितीनुसार, या कारवाया एका डेटाबेसवर आधारित असतात. ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या स्मार्ट फोन्सच्या डेटाबेसमधून काढली गेली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या उपकरणांमधून काढलेल्या तपशिलाचे विश्लेषण करून त्यांचे लक्ष्य धोरणात्मकपणे निवडत आहेत.

महाराष्ट्र एटीएसला ‘हनीट्रॅप’चा तपास करताना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा व गौरव पाटील यांच्यातील ९०० चॅट सापडले. हा गौरव पाटील नौदल गोदीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होता. त्याने संवेदनशील माहिती अवैधपणे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला दिली. यासाठी ‘एआय’ने तयार केलेल्या पायल ॲँगेल व आरती शर्मा या प्रोफाईलचा वापर केला. तसेच अनेक व्यक्तींवर लक्ष ठेवले होते.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांचा डाव उधळण्यासाठी भारतीय लष्कराने स्वत:चे ‘एआय चॅटबोट’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि संबंधित गुप्तहेरांना ओळखण्यासाठी याचा वापर केला जाईल.

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासात आढळले की, अनेक संशयित महिलांचे प्रोफाईल ‘एआय’ने बनवले आहेत. त्यांची नावे पायल, सोनिया, आरती, ममता व सुनीता अशी आहेत. ही सर्व प्रोफाईल पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी बनवली आहेत. ही प्रोफाईल खरी, जुनी व खात्रीशीर वाटण्यासाठी ती अत्यंत प्रभावी बनवली आहे. या प्रोफाईलसाठी मॉडेल, अभिनेत्री, घटस्फोटित महिला व गरजू महिलांचा वापर केला आहे. सोशल मीडियावरून कोणताही संरक्षण अधिकारी, जवान, नोकरशहा हा त्यांच्याशी संपर्कात आल्यानंतर या काल्पनिक पात्राचा वापर केला जातो.

logo
marathi.freepressjournal.in