अमेरिकेचे मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना

मध्य-पूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली सर्वात मोठी आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड’ इराणच्या दिशेने रवाना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना
अमेरिकेचे मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवानाPhoto : X (U.S. Navy)
Published on

वॉशिंग्टन : मध्य-पूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली सर्वात मोठी आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड’ इराणच्या दिशेने रवाना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

‘यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड’ हे अमेरिकेच्या नौदलातील सर्वात आधुनिक विमानवाहू जहाज मानले जाते. या जहाजावर सुमारे पंचाहत्तरहून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर तैनात करता येतात. तसेच हजारो सैनिक आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली यामध्ये आहे. त्यामुळे या जहाजाची तैनाती ही केवळ लष्करी हालचाल नसून एक ठोस संदेश मानला जात आहे. यापूर्वीच अमेरिकेचे आणखी एक विमानवाहू जहाज ‘एसएस अब्राहम लिंकन’ मध्य-पूर्वेत तैनात आहे. त्यामुळे आता त्या भागात अमेरिकेच्या दोन मोठ्या युद्धनौका उपस्थित असतील. यामुळे इराणवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वातावरण संवेदनशील

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध मागील काही काळापासून तणावपूर्ण आहेत. अणुकार्यक्रम, प्रादेशिक राजकारण आणि लष्करी हालचाली या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये मतभेद वाढले आहेत. अमेरिकेने इराणला चर्चेसाठी तयार करण्यासाठी दबावाची भूमिका घेतल्याचे दिसते. मात्र, युद्ध हा शेवटचा पर्याय असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे मध्य-पूर्वेतील वातावरण अधिक संवेदनशील झाले आहे. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी त्या भागातील उड्डाणांमध्ये बदल केले आहेत. तसेच जागतिक तेलबाजारावरही या तणावाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची ही हालचाल थेट युद्धाची तयारी नसून इशारा देण्याचा प्रयत्न आहे. लष्करी ताकद दाखवून इराणवर राजनैतिक दबाव आणण्याचा उद्देश असल्याचे मानले जाते. एकूणच, अमेरिकेचे सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना होणे ही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड ठरली आहे. पुढील काही दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध कोणत्या दिशेने जातात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in