

हो चि मिन्ह : व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांची स्पीडबोट उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कॅप्टन गुयेन होंग हाई याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. खराब हवामानामुळे ही घटना घडली की सागरी सुरक्षा नियमात त्रुटी राहिल्या आदींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी बोटीची कागदपत्रे, तांत्रिक तपशील व अन्य पुरावे जप्त केले आहेत. चालक व अन्य सदस्यांची चौकशी केली आहे. प्रवासाच्या काळात हवामानाचा इशारा, सुरक्षा नियम व संचालनाबाबतच्या नियमांचे पालन झाले की नाही याचा तपास केला जात आहे.
१५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मायदेशी आणण्याची तयारी सुरू
बोट दुर्घटनेतील मृत १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव हो चि मिन्ह सिटी येथे पोहोचले असल्याचे रविवारी व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सांगितले. आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतांचे पार्थिव भारतात पाठवले जाईल.
दूतावासाने सांगितले की, दुर्दैवी नौका दुर्घटनेतून वाचलेल्या १५ नागरिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते भारतात परतत आहेत. अतिदक्षता विभागात असलेल्या दोन रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून तो भारतात परतत आहे. दुसरा रुग्ण फु क्वोक येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.