Bangladesh: बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; ९१ जण ठार, संचारबंदी जारी

Bangladesh Protests: हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्तारूढ अवामी पक्षाचे समर्थक यांच्यात रविवारी जोरदार धुमश्चक्री झाली. त्यामध्ये १४ पोलिसांसह ९१ जण ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत.
Bangladesh: बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; ९१ जण ठार, संचारबंदी जारी
AFP
Published on

ढाका : सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून आता पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्तारूढ अवामी पक्षाचे समर्थक यांच्यात रविवारी जोरदार धुमश्चक्री झाली. त्यामध्ये १४ पोलिसांसह ९१ जण ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत.

हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलक जमले होते. अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. बांगला देशातील १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत ९१ जण ठार झाले. जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा आणि स्टेन ग्रेनेडचाही वापर करावा लागला. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी जारी करण्यात आली आहे. हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसमवेतच आरक्षण सुधारणेच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातील मृतांच्या वारसांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

असहकार आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील चौकात आंदोलक एकत्र आले आणि सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू केली. सरकारी नोकऱ्यांसाठीची कोटा पद्धत रद्द करावी यासाठी मोठे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकामध्ये किमान २०० जणांचा मृत्यू झाला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाने पाठिंबा दिलेल्या काही गटांचा आंदोलनात सहभाग आहे. ढाक्यातील एका रुग्णालयावर आणि अनेक आस्थापनांवरही हल्ले करण्यात आले. ढाक्यात एके ठिकाणी बॉम्बचा स्फोटही घडविण्यात आला.

हा घातपात - शेख हसीना

शेख हसीना यांनी सुरक्षा व्यवहार राष्ट्रीय समितीची तातडीचे बैठक बोलावली असून त्याला लष्कर, हवाई दल, नौदल आणि पोलिसांसह विविध यंत्रणांचे अधिकारी हजर होते. निदर्शनांच्या नावाखाली देशात घातपात घडविणारे आंदोलक विद्यार्थी नसून ते दहशतवादी आहेत, असे हसीना यांनी म्हटले आहे. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ४जी इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in