स्टॉकहोम : रशिया-युक्रेनमध्ये तणाव वाढल्यानंतर फिनलँड, नॉर्वे, स्वीडनने नागरिकांना युद्धाचा ॲॅलर्ट जारी केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करा व सैनिकांना युद्धासाठी तयार करण्याचे आदेश या देशांनी जारी केले.
या तिन्ही देशांच्या सीमा रशिया व युक्रेनला लागून आहेत. युक्रेनवर अणु हल्ला झाल्यास या देशांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नॉर्वेने आपल्या नागरिकांना पत्रके वाटून युद्धाबाबत सावधता बाळगण्याचे आवाहन केले.
स्वीडननेही आपल्या ५२ लाख नागरिकांना पत्रके पाठवली असून अणुयुद्धापासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आयोडीनच्या गोळ्या सोबत ठेवण्यास सांगितले आहे.बायडेन प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी रशियाच्याविरोधात युक्रेनला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली. त्यामुळे रशिया-युक्रेनमधील तणाव वाढला आहे.
फिनलँडची रशियाला लागून १,३४० किमीची सीमा आहे. युद्ध परिस्थितीसाठी फिनलँड सरकारने नागरिकांसाठी संकेतस्थळ तयार केले. देशावर हल्ला झाल्यास सरकार काय करणार याची माहिती या संकेतस्थळावर फिनीश सरकारने दिली. युद्धाच्या काळात वीज कपात होणार असल्याने पॉवर बॅकअप तयार ठेवावी, असा सल्ला सरकारने दिला.
युक्रेनमधील वकिलात अमेरिकेकडून बंद
अमेरिकेने युक्रेनची राजधानी कीव्हमधील आपली वकिलात बंद केली आहे. युक्रेनमध्ये जाणाऱ्या अमेरिकी प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही धोकादायक परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन अमेरिकेने केले. इटली, ग्रीसच्या अमेरिकन वकिलातींनी कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले.